पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/346

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजातील माणसांच्या सुख-दुःखाची, संघर्ष लढ्याची प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कृतीद्वारे वा सहानभतीने जाणून घेऊन ती व्यक्त करणे व माणसाला जगण्याला बळ देणे, त्याला प्रसंगी पेटवणं तर कधी रिझवणं अशा पद्धतीने आपल्या प्राप्त व विकसित होणाऱ्या प्रतिभारंगात मिसळून व्यक्त होते.
 मी स्वत:ला सामाजिक प्राणी समजतो व माझी नाळ सदैव माणसाच्या दु:ख वेदनेशी जोडलेली गेलीय असं वाटतं. खरं तर टॉलस्टॉयनं म्हणल्याप्रमाणे सुखाच्या - आनंदाच्या कहाण्या फार एक दोन होतील, पण दु:ख, वेदना आणि संघर्षाच्या शेकडो कथा होऊ शकतात. मला तर प्रत्येक माणसाचं दुःख, संघर्ष हा माझ्या लेखनाचा कच्चा माल वाटतो. अशा माणसाचं अंतरंग प्रतिभा, स्वानुभव, चिंतन आणि मनन करून जाणणं व शब्दाच्या माध्यमातून प्रकट करीत माणसाच्या दुःख - वेदनेशी संघर्ष करणाऱ्या त्याच्या विजिगीषू वृत्तीला बळी देणं ही माझ्या लेखनाची सर्वात प्रबळ प्रेरणा आहे, असं मी मानतो.
 आज एकविसाव्या शतकातलं जग स्फोटक बनलं आहे. गरिबी, मूल्यांचा हास, दशहतवाद, क्रौर्य आणि सत्तेमुळे होणारी दडपशाही यामुळे सामान्य माणूस निराश, हतबल व कुंठित झाला आहे. त्याला स्वर देत आत्मभान मला देता येईल व त्याचा जगण्याचा विश्वास अंशमात्रानं का होईना वाढवता येईल का हा माझ्या सतत प्रयत्न राहिला आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर इंडिया विरुद्ध भारत हा संपन्नता विरुद्ध अभाव, विकृतीच्या टोकापर्यंत पोचलेला सुखभोग विरुद्ध भूक व जगण्यसाठी चोरी खून करण्यापर्यंत मजबुरीनं पोचलेली दुसरी असह्य विकृती आणि आत्महत्त्येपर्यंतची निराशा व संपलेपणाचा विषम संघर्ष आहे. तो आपल्या लेखनातून प्रकट होताना वाचकांना मी काय देऊ शकतो, याचं मी सातत्यानं भान बाळगतो. तसेच 'हॅव नॉट' म्हणजेच 'नाही रे' वर्गाची बाजू घेत त्यांच्या कथा लिहिणे ही पण माझी एक स्वाभाविक प्रेरणा आहे, तसेच ते विचारपूर्वक बनवलेले तत्त्वज्ञान आहे. मात्र त्यासाठी कोणताही एक 'इझम' वा तत्त्वज्ञान हा मानवी कल्याणाचा अक्सीर रामबाण इलाज आहे. असे मी मानीत नाही. माझा असेल इझम तर तो नि:संशयपणे निखळ मानवतावाद आहे.

 पुन्हा, मी पूर्णत: व्यक्तीवादी व व्यक्तिस्वातंत्र्याचा भोक्ता आहे. प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत, इतरांना त्रास होणार नाही एवढी काळजी घेत मनचाहे जगायचा पूर्ण अधिकार आहे. मग आंतरजात - धार्मिक विवाहाची बाब असो, होमो सेक्युॲलीटाचा प्रश्न असो, 'लिव्ह इन' मध्ये राहात लग्नसंस्थेला नकार देण्याचा प्रश्न असो - येथे माणसाचं वर्तन त्याच्या स्वत:च्या नैतिकतेच्या कसोटीवर मी पारखायचा प्रयत्न करतो, मग त्याचं / तिचं हे वर्तन समाज मान्यतेच्या चौकटीत बसो वा न बसो .....

अन्वयार्थ □ ३४७