पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकल्प राबवला हे काय कमी आहे? राळेगण सिद्धी व हिवरे बाजारप्रमाणे आदर्श गाव योजनेचे सार्वत्रिकीकरण झाले नाही म्हणून का त्याचे महत्त्व कमी समजायचे? तसेच या माझ्या 'सेव द बेबी' प्रकल्पाचे आहे. मी सर्वोत्तम काम केले याचे समाधान आहे. कोल्हापूरला कलेक्टर म्हणून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले, तेही मला मोलाचे वाटतात. अनाथ बालकांसाठी काम करणाऱ्या बालसंकुलच्या दोन कोटीच्या दोन इमारती मला लोकवर्गणीतून उभारता आल्या याचं समाधान काय वर्णावं? शाहू स्मारक भवनाचे नूतनीकरण व विस्तारीकरण करून एका सांस्कृतिक केंद्राचे त्याला रूप दिले, राजर्षि शाहू महाराजांचा विचार थोडाफार राबविला, याचं समाधान काही और आहे. हे सर्व मला महत्त्वाचे वाटते.
 पूर्वार्धात व उत्तरार्धात प्रशासक म्हणून माझी तत्त्वं व कामे तशीच होती, पण आय.ए.एस. झाल्यावर अधिकार मिळाले, त्याचा वापर करून एक प्रशासक किती उत्तम काम करू शकतो याचा वस्तुपाठ घालून दिला. हे मला करता आलं ते माझ्या ध्येयवादामुळे व आदर्श प्रशासनाच्या स्वप्नामूळे. याचा मला लेखक म्हणून व एक भारतीय नागरिक म्हणून जरूर फायदा झाला असं वाटतं.
विनोद शिरसाठ :
 मराठीतले बहुतांश ललित लेखन 'खाउजा' म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण याबाबत नकारात्मक सूर लावतात असे दिसते. तुमच्याबाबत असे झालेले दिसत नाही. याचे कारण तुमचे प्रशासनातले अनुभव, की अन्य काही वेगळे कारण आहे? याबाबत आपले एकूण चिंतन तसेच साहित्याच्या संदर्भातले त्याचे महत्त्व आम्हांस जाणून घ्यायला आवडेल.
लक्ष्मीकांत देशमुख :

 भारतामध्ये १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थकारणाच्या संदर्भात खुलेपणाचे म्हणजेच उदारीकरणाचे काही निर्णय घेतले. त्यांनी व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहरावांनी ते अंमलात आणले, त्या काळातच माझी प्रशासकीय कारकिर्द बहरली, म्हणून याबाबत माझे चिंतन आपणास जाणून घ्यायचे आहे. एक लेखक- विचार करणारा (स्वत:ला विचारवंत समजत नाही, पण याबाबत मी बराच अभ्यास केला आहे) लेखक व प्रत्यक्ष शासनात काम करणारा प्रशासक अशा दुहेरी नात्यानं मी या प्रश्नाकडे कसा पाहातो याचं मी प्रथमदर्शनी असं उत्तर देईन की मी याकडे पॅग्मॅटिक नजरेने पहातो. 'खाऊजा बाजूने टिमकी वाजवत नाही की विरुद्ध जात टिऱ्या बडवत नाही. आज ती वस्तुस्थिती आहे व या एकविसाव्या शतकात तिच्यासह, तिच्या गुणदोषासह, साऱ्या जगताला व लोकांना जगावे लागणार आहे, हे एकदा आपण

३३४ □ अन्वयार्थ