पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसरा होता, तो २००१ च्या जनगणनेत स्त्री साक्षरतेमध्ये राष्ट्रीय सरासरी गाठू शकला. हे काम मला मोलाचे वाटते. परभणीला १९९५ मध्ये ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही यशस्वीपणे आयोजनही मी कार्याध्यक्ष म्हणून केले होते. याखेरीज पुरवठा विभागातील भ्रष्टाचार मोडून काढणे, जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत करणे, दुष्काळात सहा-सहा महिने एक लाखावर मजुरांना रोजगार हमीचे काम उपलब्ध करून देणे, रो.ह.यो. निगडित फळबागांची मोहीम १९९०-९२ मध्ये मराठवाड्यात यशस्वीपणे राबवणे ही कामे मला करता आली. तरीही मी विभागप्रमुख नसल्यामुळे या काळात माझ्या कामांना मर्यादा होत्या.

 पण आय. ए. एस. झाल्यावर मी विभाग प्रमुख म्हणून काम केले, तेथे प्रत्येक क्षण विकासाचे आदर्श प्रशासन करण्याचे जे ध्येय मी प्रशासकीय सेवेत येताना बाळगले होते, जे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्यासाठी मी एकही दिवस सुट्टी न घेता काम करून माझं सर्वस्व पणाला लावून करायचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी पण झालो. अकोला येथे मनपा आयुक्त म्हणून बी. ओ. टी. तत्त्वावर नफ्यात चालणारी सिटीबस सेवा, कचऱ्यापासून खत निर्मिती, उत्तम रस्ते, पाणी पुरवठा व ३५०० झोपडपट्टीचे वाल्मी योजनेअंतर्गत पक्क्या घरात रूपांतर अशी कामे केली. सांगलीला ५०० शाळांना प्रत्येकी तीन संगणक संच व पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सी. डी. देऊन शैक्षणिक गुणवत्तावाढीचा प्रकल्प, आरोग्य सेवा वाढवणे, याबरोबर २०० गावे हगणदारी मुक्त केली. जि.प.मध्ये जेंडर बजेट इंड्रोड्युस केले. मला त्या वेळी यशवंत पंचायत राज, म. गांधी उत्कृष्ट जिल्हा पुरस्कार पण मिळाले. क्रीडा संचालक म्हणून बालेवाडी पुणे येथे भारतातले सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारले व राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांचे यशस्वी नेटके आयोजन केले; पण दिल्लीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचारामुळे इथेही तसेच झाले असे समजून प्रथम ए. जी., मग कॅग व शेवटी सार्वजनिक लेखा समितीने कसून चौकशी केली. त्यांना काही सापडले नाही. यामुळे मात्र हे माझ्या व्यवस्थापन कौशल्याची कसोटी पहाणारे यश काही प्रमाणात झाकोळले गेले याचा विषाद जरूर आहे. असो. कोल्हापूरला मी तलाठ्यांना लॅपटॉप देत 'इ-चावडी' प्रकल्प राबवला. आय.टी.चा वापर करून रॉकेल व धान्याचा काळाबाजार रोखला. मुख्य म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कल्पकतेने डॉक्टर व समाज, राजकीय नेते, तथाकथित स्वयंसेवी संस्थांचा रोष पत्करूनही आय. टी आधारित 'सेव द बेबी गर्ल' ही ऑनलाईन सोनोग्राफी यंत्रणा व अॅक्टीव ट्रॅकरद्वारे मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढवून दाखवले. त्यावर हायकोर्टाने मान्यतेची मोहर उठवली. राजस्थान व मध्यप्रदेशने हे मॉडेल स्वीकारले, पण महाराष्ट्र शासनाने काही निर्णय केला नाही. पण मी एक नवा पथदर्शक

अन्वयार्थ □ ३३३