पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथा होत्या. पण त्यानंतर ओळीने (अर्थात १९९६ ते २०१४ दरम्यान) तीन थीमबेस्ड कथासंग्रह आले हे खरं आहे. या काळात इतरही कथालेखन झालं. ते 'अग्निपथ'मध्ये समाविष्ट आहे व २०१५ मध्ये प्रकाशित होणारा ‘मृगतृष्णा' या कथासंग्रहातही आहे. पण तीन थीमबेस्ड कथासंग्रह हा माझी मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे, असे डॉ. आनंद पाटील म्हणतात. त्यांचा या बाबतचा सविस्तर लेखही ही मुलाखत ज्या ग्रंथात आहे त्या माझ्या साहित्यावरील समीक्षा ग्रंथात समाविष्ट आहे. पण या संदर्भात माझी भूमिका तुम्ही विचारली याचा आनंद आहे.
 पाणी! पाणी!!' मधील सर्व सोळा कथा पाणी टंचाई व दुष्काळाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम दाखवणाऱ्या कथा आहेत. 'नंबर वन' हा कथा संग्रह खेळाडूंमधील माणूस दाखवणारा व खेळाशी निगडित जीवन असल्यामुळे त्याचे यश अपयश जीवन कसं प्रभावित करते हे दाखवणाऱ्या आहेत. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा स्त्रीभ्रूण हत्या प्रश्नावरील आठ कथांचा संग्रह आहे. म्हणून हे माझे तीन थीमबेस्ड कथासंग्रह आहेत. हा एक नवा ठसठशीत असा साहित्यप्रयोग आहे व तो अपूर्व आहे, एवढे किमान श्रेय तरी माझ्या पदरी समीक्षकांनी टाकण्यास अनमान करू नये.
 मी असे थीमबेस्ड कथासंग्रह का सिद्ध केले? यापेक्षाही एकाच विषयावर वेगवेगळ्या कथा कशा सुचल्या व मी लिहिल्यावर त्या एकत्रित का छापाव्या वाटल्या (व प्रकाशकांनी तरी का छापल्या?) हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे.
 पाणी टंचाई व दुष्काळ मी जवळून पाहिला आहे. त्याची व्यापकता व अनेक पैलू माझ्या लक्षात आले, जाणवले व मनाला भिडले. त्यात मला सलग मोठी कादंबरी दिसली नाही, तर वेगवेगळ्या पैलूंच्या कथा दिसल्या. सर्वप्रथम मी 'बांधा' ही कथा लिहिली, मग 'पाणी चोर' आणि लक्षात आलं की या एकाच प्रश्नाचे विविध पैलू असणारी बरीच कथाबीजं मनात आहेत, घटना व पात्रं आहेत. त्यांनाही वाट देत मग मी सलगपणे त्या कथा एकामागून एक लिहिल्या. आणि वाटलं की, त्या एकत्र छापणं योग्य राहील. सुदैवानं माझ्या प्रकाशकमित्र बाबा भांडना त्याचं वेगळेपण व मोल जाणवलं आणि 'पाणी! पाणी!!' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. तसंच इतर दोन संग्रहांबाबत घडत गेलं!
 अरुण शेवते, विठ्ठल वाघ आदींनी एकाच विषयाभोवती कविता मालिका लिहिल्या आहेत. पण त्यांनी एकाच काव्यसंग्रहपुरता हा प्रयोग केला. मी गद्य साहित्यात तीन कथासंग्रह एकाच विषयाशी संबंधित लिहिल्यावर जाणीवपूर्वक थीमबेस्ड स्वरूपात प्रसिद्ध केले.

 जरी या तीन कथासंग्रहात विषयाचं एकारलेपण असलं तरी त्यात तोचतोचपणा

अन्वयार्थ □ ३३१