पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथांचा स्थायीभाव असतो. म्हणून या कथा वाचताना हटकून घेतलेली प्रचारकी भूमिका प्रसरण केली जात आहे, असे जाणवतही नाही. कथामूल्यात भावनेची परिणती असते. ही भावपरिणती वाङ्मयमूल्य रूपात झालेली असल्याचे ध्यानात येते. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' ह्या अत्यंत गंभीर विषयाच्या कथा थीमबेस्ड वाटत नाहीत तर मुळातच माणूसपणाच्या संरक्षणार्थ घेतलेली हितैषी भूमिका वाटते. आतून हेलावून टाकणाऱ्या कथा आहेत.
 १९९७ साली प्रकाशित झालेला 'उदक' हा संग्रह २००७ साली 'पाणी! पाणी!' अशा आक्रोशाच्या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे. मुखपृष्ठावरील मृगजळ आणि तडकून फुटलेला माठ या चित्रामधून पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य ध्वनित केले आहे. ग्रामजीवन अनेक पातळीवरून भयावह होऊन भेटते. किती समस्यांना लेखकाने संवेदनशीलतेने सामोरे जावे? तरीही दर एका समस्येत लेखकाची प्रश्न मांडण्याची भाषा टवटवीत, अथकच वाटते. अनेक पातळीवरून थीमला 'बेस' दिल्याने कथांचे रूप मोठे व्यापक, दांडगे झालेले आहे. शिवाय थीमला ‘भूमिके'चा बेस आहे. थीमला लेखकाच्या भूमिकेचा बेस नसेल तर कथेत औपचारिक प्रचारकी थाट डोकावतो. या कथांच्या निर्मितीत अभिजाततेच्या आणि कलात्मकतेच्या रंग - रेषांचाही मिलाफ झाला आहे.
 गावाचा एकेकाळचा सगळा कारभार जातव्यवस्थेचा होता. आता स्वरूप बदलत आहे. पण गावात जातीयता असूनही एकप्रकारचे सलोख्याचे संबंध त्या काळात होते. याची कल्पना 'कंडम' कथेमधून येते. बायजाचं वय झालेलं आहे. तिचा मुलगा-सून औरंगाबादेला पोट भरायला जातात. म्हातारी बायजा गावातील उच्चभ्रूकडून शिळंपाकं घेऊन कशीबशी जगते. तिला विहिरीचे पाणी गावातीलच लोक कालून देतात, सखोबा भुजबळ संजय गांधी निराधार योजनेमधून शंभर रुपयांची पेन्शन काढून देतात. बायजा जगण्यासाठी असमर्थ होती तेव्हा स्वाभिमानासाठी बंद म्हारकी वतनाची आठवण करून शेर - अदलीभर जोंधळा नेत असते. गावातील लोकच सुना-लेकींच, बाईचं दु:ख बाईलाच माहीत म्हणून पाणी काढून देतात. नजर अधू झालेल्या, पाठीत बाक आलेल्या बायजेचे जातभाई तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. ती एक दिवस रात्री विहिरीत चुकून पडून मरते तेव्हा जातभाईंचा प्रश्न तिच्या मरणाच्या दु:खापेक्षा “छान जिरली त्यांची. आमास्नी हक्क असून सुद्धा तिथं पानी भरू देत नाहीत. आता घ्या, आमची एक म्हातारी तिथं बुडून मेली' (पाणी! ..... पृ. ११०) हे दु:ख जास्त होते. म्हातारीचा मुलगा - सून आल्याचे पाहून एक टोळकं म्हणतं "चला कांबळ्याकडं, लग्नाचा टाइम होतोय.” स्वार्थापायी एकमेकांच्यातील आपुलकी व स्नेहभाव आटत चाललेले आहेत. एकेकाळी समाजातील बहिष्कृत लोक
३४ अन्वयार्थ