पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची अनुयायी राष्ट्रे त्यापासून अभुक्त आहेत. पंजाबमधील खलिस्तान चळवळीमुळे काही काळ शीख कट्टरवादाचा व दहशतवादी कृत्याचा भारताला परिणाम भोगावा लागला होता, पण तो आता शमला आहे. त्यामुळे जगासाठी आज इस्लामच्या नावाने चालणारा व देशांच्या सीमारेषा मोठ्या प्रमाणात ओलांडलेला दहशतवाद ही आणि चिंतेची बाब आहे. आणि अमेरिकेची युद्धखोर नीती, वेड्या साहसवादाने व जगाच्या नियंत्रणाचा ठेका घेतल्याप्रमाणे वागणाऱ्या अमेरिकेमुळे आगीत तेल ओतून ती अधिक भडकवावी, तसं या दहशतवादाला बळ मिळत आहे. म्हणून 'इन्किलाब' च्या माध्यमातून तालीबानी जिहाद्यांचं अंतरंग मी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचेही पाय मातीचे आहेत व त्यांची ही धर्मनिष्ठा कडवी असूनही मूलभूत मानवी षड्विकारापासून ते मुक्त नाहीत आणि निसर्गनियम पाहाता ते शक्यही नाही; म्हणून ती शेवटी माणसे आहेत. त्यांचं हे मानवीपण मला लेखक म्हणून एक्सायटिंग वाटलं. ते मी येथे मांडलं आहे.
 पुढील काळात मला केव्हा तरी काश्मीरवर कादंबरी लिहायची आहे. तेथेही मला या विषयाचा सामना करावा लागणार आहे. कारण काश्मीर समस्येचा इस्लामी पैलू व धर्माधिष्ठित दहशतवाद हे रोकडे वास्तव मला तेथेही मांडावे लागणारच आहे. काश्मीरची ओळख म्हणजे शैव, बौद्ध, सूफी, इस्लाम व शीख धर्मातून विकसित झालेली खास ऐतद्देशिय सांस्कृतिक वारसा- धरोहर वा विरासत आहे. तिला 'काश्मीरियत' म्हणता येईल. ती खच्ची करून तिला कट्टर वहाबी इस्लामी परंपरेत परावर्तित करण्यासाठी पाकिस्तान व काश्मीरचे हुरियत नेतृत्व प्रयत्नशील आहे. पंडितांचं स्थलांतर फोर्सफुली घडवून आणत काश्मीर खोरं हिंदू-शीख विरहित करीत त्याचं पूर्ण इस्लामीकरण करीत ते पाकिस्तानला जोडण्यासाठी फाळणीचं राहिलेलं काम (अनफिनिशड अजेंडा) मानून प्रयत्न करणं, हे सारे पदर काश्मीर समस्येला चिकटलेले आहेत. त्यामुळे येथेही जिहादी अंतरंग जाणत पात्रांद्वारे मांडणं मला भाग आहे. पाहू या कसं जमतं ते!
प्रा. रूपाली शिंदे :
 आपण 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' वर बरेच बोललो आहोत. आता मी तुमच्या थीमबेस्ड कथासंग्रहबाबत विचारू इच्छिते. एक मध्यवर्ती प्रश्न घेऊन त्याभोवती अनेक कथा लिहिणं व त्या एकत्र कथासंग्रहाच्या रूपानं प्रसिद्ध करणं या मागे लेखक म्हणून तुमची काय भूमिका आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :

 'कथांजली' व 'अंतरीच्या गूढगर्भी' या दोन कथासंग्रहात विविध विषयांवरच्या

३३० □ अन्वयार्थ