पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघटना- सिमी आदींचं कार्य आणि जामा मस्जिदचे इमाम आदींचे उद्दाम बोलणे, ओवेसी बंधूंची जहरी भाषा यामुळे दहशतवादी कृत्ये होताना दिसतात. पुन्हा गेली साठ वर्षे काश्मीर प्रश्न, पाकिस्तानने धगधगता ठेवला आहे. त्यासाठी दहशतवाद ही स्टेट पॉलिसी ते आचरतात. त्याची प्रतिक्रिया हिंदू समाजातून उमटते. एकीकडे काँग्रेसचा व समाजवाद्यांचा अतिरेकी स्वरूपाचा मुस्लीम अनुनय (मतांसाठी) तर त्याच्या दुसऱ्या टोकाला संघपरिवार व भाजप आदींची तीव्र प्रतिक्रिया- हिंदूंमधली (अनाठायी) भीती कुरवाळीत धर्मकारण करणं-उघड वा छुपं (तेही पुन्हा मतासाठी) यातून जमातवादाला खतपाणी मिळत चाललं आहे. यात दोन्ही राजकीय प्रवाह दोषी आहेत- जास्त काळ सत्ताधारी असणारे थोडे जास्त दोषी आहेत, असं म्हणता येईल. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमधल्या झालेल्या पराभवानं काँग्रेसला आत्मचिंतन करायला भाग पाडलं व सत्तेवर आल्यामुळे व २० कोटी मुस्लिमांना अराष्ट्रीय समजून, दूर लोटून राज्य करणं शक्य नाही हे भान भाजपला आलं तर तो सध्याच्या फोफावलेल्या जमातवादाच्या पराभवाचा आरंभबिंदू ठरेल. पण हा समंजसपणा दोघांनीही एकाच वेळी दाखवायला हवा. पण हाच खरा प्रश्न आहे.
 तरीही भारतीय जमातवादाची तुलना अफगाणिस्थानच्या व आता खऱ्या अर्थाने जागतिक बनलेला धर्माधिष्ठित इस्लामिक दहशतवादाशी होऊच शकत नाही. कारण भारतात बळकट लोकशाही आहे, खुला मीडिया आहे, प्रोअॅक्टिव्ह, स्वतंत्र व निष्पक्ष अशी न्यायपालिका आहे आणि मुख्य म्हणजे आम भारतीय हा सहिष्णू, उदार व सेक्युलर आहे. अगदी संघपरिवारातील तथाकथित जहाल जमातवादी हे आंतरराष्ट्रीय धर्माधिष्ठित कट्टरपणाच्या तुलनेत अंशमात्रही जहाल व कट्टर नाहीत. त्यामुळे मला भाजपप्रणीत (तथाकथित) भगवी राजवट सत्तेवर आल्यामुळे भारताचं कसं होणार याची चिंता वाटत नाही. कारण आपली घटनाप्रणीत लोकशाही राजवट आहे. आणि ती पूर्णत: सेक्युलर आहे व तिचे रक्षण न्याययंत्रणा डोळ्यात तेल घालून करीत असते. रामजन्मभूमी- बाबरी मशिदीबाबतचा अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय म्हणजे धार्मिक, जटिल संघर्षमय प्रश्नांचा सुंदर असं सेक्युलर उत्तर आहे. तो जर सर्व स्टेक होल्डर्सनी मान्य केला तर भारतीय सेक्युलरझिमला बळकटी येईल.

 भारतीय सेक्युलॅरिझमला धोका आहे तो धर्मगटांना-जातसमूहांना 'व्होट बँक' समजून त्यांच्या जुनाट परंपरावादी वृत्तींना कुरवाळीत बळ देण्याचा. तो करण्यात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही, ही खरी चिंतेची बाब आहे. जमातवाद हे त्याचं दृश्यरूप आहे. या पोपटाचा प्राण राजकीय पक्षांच्या स्पर्धात्मक धर्मगट व जात समूहांच्या तुष्टीकरणात आहे, त्याचा गळा घोटला की जमातवाद संपलाच म्हणून समजा. आणि भविष्यात हे घडू शकतं- शकेल, असा माझा अभ्यास सांगतो.

अन्वयार्थ □ ३२७