पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मतं आहेत. मी माणसाच्या जगण्याच्या संघर्षाच्या कथा लिहितो, माणूस जगताना किती असाहाय्य होतो, कधी अमानुष वागतो तर कधी अगतिकतेचा (इतरांच्या) गैरफायदा घेतो, हे रोकडे सत्यच आहे. ते मी अनेक कलाकृतींतून मांडले आहे. ते अतिरंजित आहे का? त्यात घटनाक्रमाचा वेग व परखड दाहक वास्तवाची सांगड घालताना कलात्मक विश्वासार्हता निर्माण माझ्या लेखनातन होत नाही- असं आपलं प्रश्नवजा निरीक्षण आहे. त्यावर मी हे सांगू इच्छितो की, अतिरंजितपणा कशाला म्हणायचा हाच मुळी प्रश्न आहे. जेव्हा माणूस (स्त्री पण) जुनाट परंपरेला कवटाळीत भ्रूणहत्या करतो, डॉक्टर पुरावा राहू नये म्हणनू स्त्रीभ्रूण कुत्र्याला खाऊ घालतात- हे वास्तव आहे. ते अतिरंजित कसं म्हणायचं? मालक जेव्हा बालकांना कायदे धाब्यावर ठेऊन कामावर ठेवतो व त्यांचं शोषण करतो व त्याचं बालपण करपून जातं - हे ज्यांना ते विश्व माहीत नाही त्यांना अतिरंजित वाटणं साहजिक आहे. पण ते धगधगतं वास्तव आहे आणि (तथाकथित) कलात्मक विश्वासाहर्ता समीक्षकांना जाणवावी म्हणून जे काळं गडद आहे, ते पुसट करून त्यात 'ग्रे' शेडस् शोधलीच पाहिजेल का? मान्य, की क्रूर व जुलमी व्यक्तींनाही मानवी भावना असतात- त्या भीतीच्या असतात. खचितच करुणा- प्रेमाच्या नसतात. 'हरवलेले बालपण' मध्ये दुर्गाप्रसाद हा बालकांचं शोषण करणारा उन्मत्त अती भोगानं एडस्चा शिकार होतो व मरणाच्या दाराशी भीतीनं हतबल होतो. हे मी दाखवलं आहे, ते कलात्मक विश्वासार्ह नाही का? पण त्याचा सुशिक्षित मुलगा अंबाप्रसाद थंडपणे क्रौर्याचे शोषणाचे अनैतिक तत्वज्ञान सांगतो, तो वाचताना वाचकांच्या अंगावर काटा येईल, पण तो वास्तव नाही का? प्रत्येक पात्राचं 'ग्रे' शेडमध्ये मानवीकरण करणंच कलात्मक असत्य मी म्हणतो. त्यामुळे बळी जाणाऱ्या शोषित माणसांच्या चित्रणात सहृदयदेनं स्पर्श देत मी कलात्मक विश्वासार्हता निर्माण केलीय असं मला वाटतं. तसेच मेलोड्रामा- अतिरंजिकपणाला साहित्यात का त्याज्य मानायचं? सिनिसिझम व अबॅसर्डिटीला आपण कलात्मक सत्य मानत असू तर अमानुष वागणाऱ्या माणसाचं रेखाटन करतानाचा डार्कपणा अतिरंजित समजून कलात्मकतेच्या फूटपट्ट्यावर कमअस्सल का मानायचा? बोधवाद, ध्येयवाद, मंगलता यांना साहित्यात तुच्छ का लेखायचं? जर ते कथेद्वारे लेखकाचं तत्वज्ञान म्हणून न घेता कथेचा अविभाज्य भाग म्हणून येत असेल तर का नाही स्वीकारायचं?

 मी येथे रामायण व महाभारताचं उदाहरण देईन. त्याला मी वाल्मीकीदृष्टी (रामायणकार) व व्यासदृष्टी (महाभारतकार) असं म्हणतो. व्यासदृष्टी काय सांगते? माणसाचा लोभ, विकार, सत्तासंघर्ष, पतन, कोसळणं व अनैतिकता सांगते. दाजी पणशीकरांनी तर महाभारत हा एक सूडाचा प्रवास आहे असाच अन्वयार्थ लावला आहेच की! या उलट वाल्मीकदृष्टी आदर्शवाद सांगते, उच्च मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या

३२२ □ अन्वयार्थ