पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतो? त्याचे 'डिव्हाईस' काय आहे? निवेदन, भाष्य, पात्रांचे चरित्रचित्रण, संवाद, घटनाप्रधानता- हे सारे रायटींग डिव्हायसेस आहेत. अमुक एक 'डिव्हाईस' वापरायचा म्हणून लेखन होत नाही, तर जे कथाबीज लेखक साकारतो, तो कथाशय डिव्हाईस निवडतो. तरीही कळत-नकळत प्रत्येक लेखकाचा एक वा काही विशिष्ट डिव्हाईस वापरण्याकडे स्वाभाविक कल असतो.
माझी स्वत:ची लेखन प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक व नैसर्गिक आहे. मला फक्त सुरुवात सुचायला वेळ लागतो. पहिला परिच्छेद जमला की पुढे नैसर्गिक ऊर्मीनं लिहीत जातो. आणि जेव्हा कथा पूर्ण होते, तेव्हा मीच चकित होतो. 'अरेच्चा! हे कथाबीज सुचताना मनात नव्हतं, पण ते अंत:प्रेरणेतून लिहिताना आलं कसं?-' पण हे असं माझं मीच लेखक म्हणून चकित होणं मला लेखक म्हणून समाधान देणारं असतं. आणि मग ती वाचताना वाटतं, की मी अमुक एक लेखनाचं 'डिव्हाईस' वापरलं आहे. म्हणून माझ्या लेखनात मी पात्रचित्रणास महत्त्व देत नाही हे तितकेसे प्रस्तुत वाटत नाही. अर्थात साक्षेपी समीक्षक व मराठीचे अभ्यासक म्हणून तुमचं हे मत मला पटत नसलं तरी असू शकतं, हे मान्य करण्यास मला संकोच वाटत नाही.
प्रा. रूपाली शिंदे :
 'पाणी! पाणी!!' (उदक) या 'तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा' या उपशीर्षकासह असलेल्या कथासंग्रहास दुष्काळ, पाण्याचा अभाव आणि त्या अनुषंगाने अनेक उपविषय- पुरुष सत्ता, जातजाणीव, प्रशासनाची भूमिका, शहरी मंडळीचा दृष्टिकोन असे अनेक विषय आले आहेत. त्यामुळे नेम एकीकडे धरताय आणि दगड दुसरीकडे लागतोय असं घडतं? तुम्हांला काय वाटतं?
लक्ष्मीकांत देशमुख :
 क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही या प्रश्नानं गुगली टाकलीय, पण लक्षात घ्या, मी 'नंबर वन' हा खेळावरचा कथासंग्रह सिद्ध केलाय, त्या अर्थानं मी खेळाडू आहे आणि अशा प्रश्नाची गुगली कशी परतवावी हे मी जाणतो. जोक्स अपार्ट, या प्रश्नानं माझ्या पुस्तकाचं महत्त्व तुम्ही अधोरेखित केलंय असं मला वाटतं. कसं ते सांगतो.

 पाणी टंचाई व त्याची परिणती म्हणजे कोरडा दुष्काळ मी जवळून पाहिला आहे, त्याचा सामना केला आहे. त्याचा मानवी जीवनावर, जगण्यावर व नातेसंबंधांवरमग ते पती-पत्नीचं असो, कुटुंबाचं असो, गावकीचं असो वा सामान्य माणूस विरुद्ध राजकारण-प्रशासन असो, त्यात मला ललित लेखक म्हणून कुतूहल कणव, कन्सर्न आणि सहअनुभूती आहे. त्यात मला कथा दिसते- ती वेदनेची,

३२० □ अन्वयार्थ