पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामकाज, जबाबदारी पूर्ण करताना कधी लेखकाची नजर त्याचे चिंतन किंवा हे तीव्रतेने लिहिलेच पाहिजे या प्रकारचा अनुभव- स्वत:शी भांडण, कोंडमारा तुम्ही अनुभवलात का? तो अनुभव, ते विचार सांगावेत.
लक्ष्मीकांत देशमुख :
 माझ्या एका आत्मपर लेखनात मी माझ्यासाठी लेखन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं होतं, ते शंभर टक्के खरं आहे, असं मी आजही म्हणू शकतो. कारण लेखनाप्रमाणेही मी निर्मितीक्षम, रचनात्मक असं कल्पक प्रशासन केलं आहे. मी गंमतीनं म्हणतो, जशी मला कथा सुचते, तसं प्रशासनातलं कामही सुचतं. जसा माझ्यातला लेखक एखाद्या प्रसंगाकडे- एखाद्या माणसाकडे नव्या पद्धतीने बघतो, तसंच काम करताना प्रश्नांच्या नव्या अनोख्या बाजू मला चटदिशी समजतात आणि 'आऊट ऑफ बॉक्स' उत्तर सुचतं. त्यामुळे लेखक आणि प्रशासन असं द्वंद्व माझ्यासाठी नाहीय. हां, हे खरं आहे की, जे काही सुचतं ते त्याक्षणी कामाच्या व्यापामुळे लिहिता येत नाही, पण मी ते मनात काही काळ घोळवतो आणि त्याची डायरीत नोंद करतो. अनेकदा मनात त्याची उजळणी करतो व मग लिहितो. खरं सांगू का, कथानक सुचणं हाच एक क्षण प्रतिभेचा- हवं तर दैवीपणाचा क्षण असतो. बाकी ते कागदावर उतरविणं ही बरीचशी कामगिरी असते.

 दुसरं म्हणजे माझ्यातल्या लेखकाला अनुभवसमृद्ध होण्यात प्रशासकाची मदत झाली आहे. मला अनुभवासाठी प्रवास- स्थलांतर फारसं वगैरे करावं लागत नाही, तर ते कामकाजात माझ्या विविध पदांमुळे आपोआप माझ्यासमोर उभे राहातात. हां, त्याला हेरण्याची- पकडण्याची नजर- प्रतिभा हवी. ती मला थोडी नक्कीच साध्य आहे. 'पाणी! पाणी!!' मधील अनुभव हे मला प्रशासक म्हणून टिपता आले. ते इतर कोण्या- अगदी ग्रामीण कथाकाराला पण टिपता आले नसते कदाचित. पुन्हा केवळ ज्यांच्या वाट्याला दुःख, भोग येतात, तो तसाच मांडण्यापुरताच माझा अनुभव मर्यादित राहात नाही. त्याला कारण असलेले राजकारणी, नोकरशाही व त्यांची बाजू पण माहीत असते. त्यातून कशाप्रकारे सोडवणूक होऊ शकते हेही प्रत्यक्षरूपाने माहीत असतं. त्यामुळे माझ्या कथा केवळ प्रश्न मांडत नाहीत, दुःख रेखाटत नाहीत, तर त्याची दुसरी बाजू आणि त्याचं भविष्य- त्याची सोडवणूक कशी झाली, होऊ शकते, हेही मांडू पाहातात. अनेक कथेमध्ये हे घडलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रशासनानं मला अनुभव श्रीमंती व व्यापक नजर दिली, हे नक्की म्हणता येईल!

३१४ □ अन्वयार्थ