पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिणाम... हे सारे प्रश्न मला एक लेखक व जागरूक माणूस म्हणून खुणावतात, प्रसंगी अस्वस्थ करतात. माणसाचं जगणं किती कवडीमोल आहे, हे दहशतवादामुळे जाणवतं. धर्म व विचारधारा अंतिमत: माणसाला अधिक छळतात- उद्ध्वस्त करतात. माझ्या या चिंतनातून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहून झाली. दुसऱ्या महायुद्धातील हजारो पोलंडवासी सोव्हिएत युनियनच्या तडाख्यातून जीव वाचवून कोल्हापूर नजिक निर्वासित म्हणून चार वर्षे (१९४४ ते १९४८) राहिली होती, त्यावर माझी आगामी कादंबरी आहे. तसेच काश्मीर प्रश्न आणि हैद्राबादचा मुक्तिसंग्राम यावरही मला कादंबऱ्या लिहायच्या आहेत. मुस्लीम धर्म, संस्कृती, दहशतवाद आणि सेक्युलरिझमची लागणारी कसोटी असे प्रश्न व त्यात अडकलेली व हेलपटून गेलेली, उद्ध्वस्त होणारी सामान्य माणसांची परवड व ससेहोलपट मला लेखक म्हणून खुणावत आहे.
 हे सारे मला लेखनातून शोधले पाहिजे व आपल्या प्रतिभा व प्रज्ञेनं जमेल तेवढं हे विश्व मराठी वाचकांपुढे मांडलं पाहिजे, ही माझी लेखनामागची बहुमुखी व बहुरंगी प्रेरणा आहे. आजवर आल्बर्ट कामूनं माणसाचं तुटलेपण व निरर्थकता यावर लिहिलं. ते मौलिक अर्थातच आहे; पण हेमिंग्वे आणि दोस्तोवस्की' यांनी विविध स्तराचे जीवन रसरसून भोगत ते लेखनातून मांडलं. मी स्वस्तुतीचा दोष पत्करूनही धाडसानं, पण तरीही नम्रतेनं सांगेन की मी त्या दुसऱ्या जातकुळीचा लेखक आहे. माझी लेखकाची आणखी एक जात आहे- ती 'प्रेमचंद' व 'आवारा मसीहा' म्हणून प्रसिद्ध असलेले कलंदर लेखक शरदचंद्र चटर्जी (शरद बाबू) यांची आहे. ती 'नाही रे' वर्ग, शोषित समाज आणि सामान्य माणसाप्रती कळवळा दाखवते व लेखनातून ती जिवंत करते. त्यामुळेच माझ्याही लिखाणात सामान्य वंचित गरीब माणूस आहे. प्रामुख्याने आणखी एक प्रवाह माझ्या लेखनात आहे, तो म्हणजे जीवनवादाचा. वि. स. खांडेकर हे जीवनवादाचे पुरस्कर्ते. तसेच साने गुरुजी, मामा वरेरकरही. आज कला व जीवनवादाच्या सीमारेषा एकमेकांत मिसळल्या आहेत; पण मला हा जीवनवादी अंत:स्वर प्रेरणारूप आहे. हे नक्की की, मी कुणाचंही अनुकरण करीत नाही, पण हे सारे स्तर माझ्या लेखनात कमी जास्त उमटलेले आहेत असं मला वाटतं.
 आज तुम्ही मला प्रश्न विचारून बोलतं केलं म्हणून हे सारं मलाच माझ्या संदर्भात जाणवलं, ते मी थेट व्यक्त केलं आहे. मला आशा आहे, यानं तुमचं समाधान झालं असेल.
प्रा. रूपाली शिंदे :

 प्रशासक व लेखक या दोन पैलूंचा तुम्ही समन्वय कसा साधलात? प्रशासनातले

अन्वयार्थ □ ३१३