पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भवताली जे समाजजीवन आहे, ज्याचा आपण एक घटक आहोत. त्या समाजजीवनाचे प्रश्न, समस्या आणि सुख-दु:ख याची अभिव्यक्ती करणं हा माझ्या लेखनाचा स्वाभाविक कल राहिला आहे. किंबहुना, समाजभिमुखता हा माझा मनःपिंड आहे व तो माझ्या लेखनाचा अंत:स्वर आहे. एका अर्थाने मी लोकजीवनाची काही रूपे साहित्यरूपी आरशातून समाजापुढे उभी केली आहेत, ज्याद्वारे त्यांना सहअनुभूती व्हावी; 'अरे, हे तर आपल्या जगण्याचं व प्रश्नांचं प्रभावी व प्रत्ययकारी दर्शन आहे व त्यातूनही आहे ते जीवन उद्या बदलू शकते, अधिक चांगले होऊ शकते' हा दिलासा व आशावाद जाणवावा... अशी माझी लेखनामागची प्रमुख प्रेरणा आहे, असावी असं आज मागे वळून पाहाताना वाटतं.

 खरं तर एखादा लेखक का लिहितो? जीवनातील अनेकविध अनुभवांपैकी काही अनुभव लेखनासाठी का निवडतो? कथाबीज एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग, एखादा विचार किंवा एखादी समस्या वा मनातील संघर्ष यापैकी नेमके कशातून सुचते? कधीही ज्याचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही असे हे काही गहन प्रश्न आहेत. माझ्या लेखनाचे कथाबीज या सर्वच प्रकारे सुचले आहे हे मी सांगू शकतो. जेव्हा एखादे कथाबीज सुचल्यानंतर मनात ते घर करते, वेळी-अवेळी त्याबाबत मनात विचार चालू राहातो आणि एखाद्या क्षणी आता लिहिणं अपरिहार्य आहे असं जाणवतं तेव्हा पांढरे कागद व काळी शाई (मी माझ्या हाताने कागदावर लिहितोसंगणकावर नाही.) माझ्या मनाचा कब्जा घेतात व लेखन सुरू होते. पण लिहिताना मला सुरुवात माहीत असते, पण पूर्ण कथानक नाही. लेखनाची सुरुवात मात्र माझी अडखळत होते. दोन तीन वेळा लेखनाचे पहिले - दुसरे पान मी लिहून रद्द करतो, मग केव्हातरी वाटतं, लेखनाचा प्रारंभिक अडथळा किंवा स्टार्टिंग ट्रबल दूर झालाय... मग त्यानंतर कथालेखन अंत:स्फूर्तीने पुढे सरकते. अनेकदा लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो शेवट होतो व एकूणच आपण जे लिहिलं आहे, जे सुचलं, अस्पष्टपणे जाणवलं त्यापेक्षा खूप वेगळं झालं आहे हे जाणवून माझा मीच चकित होतो. इथे तुम्हांला व तसेच वाचकांना प्रश्न कदाचित पडू शकेल की मग मूळ कथाबीज हरवलं, बदललं की विकसित झालं? तिन्ही शक्यता असू शकतात, नव्हे असतातच. हा माझा स्वानुभव आहे. पण शेवटी मनाचा तळ कितीही गाठायचा म्हटला तरी माणसात तो पूर्णत: गाठता येतो का? अशक्य आहे ते. तसंच लेखनाचं आहे. जे अभिव्यक्त करायचं होतं, लिहिण्यापूर्वी जे सुचलं होतं ते लिहिताना तसंच्या तसं प्रत्येक वेळी व्यक्त होतंच असं नाही. अशा वेळी मी पुन्हा शांतपणे माझी कथा वाचतो व एक वाचक म्हणून मला ती कशी वाटते हे कळावं म्हणून जणू काही मी नव्यानं वाचत आहे, लेखकाने काय लिहिलं आहे हे माहीत नाही अशा पद्धतीनं वाचतो. ती वाचताना

३०४ □ अन्वयार्थ