पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्नाबद्दल किती कमालीचे उदासीन आहोत हे दाखवणारी ही परिस्थिती. प्राजक्ता हा मुलीचा आणि तिच्या आईबाबांचा टीव्ही ह्या माध्यमाकडे कसे पाहावे ह्याचा दृष्टिकोन, प्रबोधन न करता, ह्यातून आपण नेमके चांगले काय निवडावे हे दाखवतो. या बालनाट्याचा शेवट नाटकाकाराने 'मिले सुर मेरा तुम्हारा' ह्या टीव्ही वरच गाजलेल्या एका गाण्याने केलेला आहे. हा शेवट टीव्ही माध्यमाचा प्रभाव दाखवतोच, पण त्या गीतातल्या ओळी खूप काही सांगून जातात. टीव्हीमुळे आजची मुले एकलकोंडी होत जाताना दिसत आहेत. त्यांचे सूर कोणाशीही जुळत नाही आहेत. नात्यातला विसंवाद आणि संवादच नसणं ह्या दोन्ही गोष्टी वाढत आहेत. आयुष्याच्या गाण्यात सूर गवसणं फार महत्त्वाचं. मुलांच्या आयुष्यातल्या गाण्याची नोट त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच कुठेतरी चुकते आहे हे नाटककार लक्ष्मीकांत देशमुख बालनाट्यातून मोठ्या कल्पकतेनं सांगतात.

३०० □ अन्वयार्थ