पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ह्या घराघरात घडणाऱ्या चर्चांना प्रातिनिधिक स्वरूप देऊन अभिरूप न्यायालयात आणून त्यावर विचारमंत्रथन घडवण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळे विचारमंथन अतिशय हलक्याफुलक्या शब्दात, मुलांचे मनोरंजन होईल अशा पद्धतीनं घडवत नेले आहे.
 मनोरंजनाचा हा विषय मांडत असताना नवरा बायकोची भांडणे, त्यांनी आपल्या पाल्याची बाजू घेणे किंवा स्वत: टीव्ही बघण्याची सवय असल्याने मुलांना बोलू न शकणे अशा पालकांच्या निरनिराळ्या घातक सवयींवर झणझणीत प्रकाशही टाकला आहे. ह्या नाटकातले एक बाबा चिमणराव ह्यांना कुठेही झोप येत असते. चिमणरावांना सारखी सारखी येणारी झोप विनोद निर्माण तर करतेच पण पालक झोपी गेले आहेत हेही हेही सुचवते. टीव्ही या माध्यमाचा आजच्या मुलांवर होणारा परिणाम एवढा आहे, की त्याचे फायदे काय आणि तोटे काय हा विचार करण्याच्याही मनोवस्थेत आजचा पालक राहिलेला नाही. एखाद्या लहान मुलाने स्वत:ला शाहरुख खान असे समजणे आणि त्याला स्वतःला त्याच्या नावाबद्दल घृणा उत्पन्न होणे हा परिणाम खूपच भयानक आहे. त्या मुलाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम आयुष्यभर होत राहाणार. त्याचे जगणे वास्तववादी होण्यापेक्षा तो स्वतः तयार केलेल्या भ्रामक विश्वात जगण्याची शक्यता अधिक. लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी हा विषय निवडून त्यातला आशय केद्रस्थानी मानून संहितेची बांधणी केलेली आहे. ह्या नाटकात फक्त बालक-पालक ह्यांनाच आरोपी न करता नाटककार शासनालाही आरोपी करतो. जबाबदारीचं भान ठेवून फक्त मुलांनीच वागावं अशी अपेक्षा करणंही चुकीचे आहे - हा विचार नाटककारक या नाट्यातून प्रखरपणे मांडतो. स्वत:ला अमीर खान आणि शाहरुख खान म्हणवणारी मुले आणि त्याचं कौतुक वाटून घेणारे पालक दाखवत आपले पालकही ह्या प्रश्नाला जबाबदार आहेत हे नाटककार दाखवतो. तसेच या टीव्हीच्या मायाजालाला न भुलतासुद्धा काही कुटुंबे त्याचा योग्य वापर करत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत आहेत हेही नाटककार दाखवतो.

 या बालनाट्याची मांडणी करताना कुठेही नाटककारानं विचार मांडण्याचा आव आणलेला नाही. मुलांना असलेले पौराणिक कथांचे आकर्षण लक्षात घेत नाटककार हळुहळु विषयापर्यंत प्रेक्षकाला पोहोचवतो. अभिरूप न्यायालयातील न्यायमूर्तीसुद्धा भीतीदायक न वाटता हसत खेळत न्यायानिवाड्याचे काम करतो. नाटकातील आई स्वत: टीव्ही च्या आहारी गेल्याची प्रामाणिक कबुली देते; सिरियलच्या ब्रेकमध्ये कसा कसा स्वयंपाक करते ते सांगते. स्त्रियांची ही सवय खरोखरच सर्वमान्य होऊ लागली आहे. वडिलांना सतत झोप येते - आपण ह्या

अन्वयार्थ □ २९९