पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो एक विचारवंत म्हणून शोकांतिकांमध्ये वापरला जातो. इथेही अब्बास हा एक विचारवंत म्हणून गुरूच्या आयुष्यावर तटस्थपणे भाष्य करताना दिसतो.
 कलाकारला त्याची कला वृद्धिंगत व्हावी म्हणून काही स्वातंत्र्य हवे, की त्याने सामाजिक परंपरांची जोखडे वाहत जमेल तेवढी कला सादर करायची असा एक प्रश्न कलाकारासंदर्भात नेहमी उपस्थित केला जातो. कलाकाराची कलाकृती हा एक प्रकारे स्वातंत्र्याचा आविष्कार असतो. कित्येकदा नैतिकतेच्या चौकटीत न बसणाऱ्या कलाकृतींना कालांतराने समाजमान्यता मिळालेली दिसते. त्या कलाकाराने त्याचे जीवन कसे जगावे ह्याचे नीतिनियम समाजाने ठरवणे कित्येकदा त्या कलाकाराला जाचक ठरू शकते. कलाकाराने मनस्वी जगणे, त्याच्यावर लादली जाणारी बंधने, वेगवेगळ्या धर्मातील स्त्रीपुरुषांच्या प्रेमात येणारी धर्माची बंधने, मनाची अतिशय संवेदनशीलता हे कलाकाराला मिळालेले वरदान आणि तोच शाप अशा कित्येक गोष्टींवर 'अखेरची रात्र' प्रकाश टाकते. आजच्या काळातील एक सशक्त शोकांतिका ठरते.

 ह्याच नाटककाराचे मी वाचलेले दुसरे एक बालनाट्य म्हणजे, 'दूरदर्शन हाजिर हो.' रूढ अर्थाने जरी ह्या बालनाट्य असे म्हटले जात असले तरी ते सर्व वयोगटातल्या स्त्री-पुरुषांसाठी आहे असे मानावे लागेल. बालनाट्य लिहिणे हीही सगळ्यात अवघड गोष्ट आहे असे मला वाटते. मुळात कुठल्याही मुलांना उपदेश नको असतो. आईबाबा तो करतच असतात. मग तोच उपदेश परत नाटकाला जाऊन कानावर आदळून का घ्यायचा, हा मुलांचा प्रश्न असतो. त्यामुळे नाटककाराला मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांना उपदेशाचा डोस वाटणार नाही तर मनोरंजन करत करत त्यांच्यापर्यंत आपला विचार पोहोचवणे हे खुबीनं करावे लागते.
 'दूरदर्शन हाजिर हो' या बालनाट्यात एक बादशहा आणि त्याचा दिवाणजी वेष बदलून ह्या नगरीत येतात. सगळ्यांवर टीव्ही या माध्यमाने घातलेले गारूड पाहून चकित होतात आणि वकील बनून प्रत्यक्ष टीव्ही या माध्यमाला आरोपी करून एका अभिरूप न्यायालयात त्याविरुद्ध खटला चालवतात. टीव्हीमुळे नव्या पिढीचे होत असलेले फायदे आणि नुकसान हा विषय नाटककार हळूहळू बाल प्रेक्षकांपर्यंत पोहेचवतो. नाटक लिहितांना नाटककाराला ते नाटक सगळ्यांना आपले वाटेल किंवा त्यातल्या व्यक्तिरेखेशी किमान तादात्म पावेल असा काही गुण संहितेत घालणे गरजेचे असते. 'दूरदर्शन हाजिर हो' या बालनाट्यात ते काम विषयच करून टाकतो. हा विषयच असा आहे की मुलांनी किती टीव्ही पाहावा यावर प्रत्येक घरातले लोक राजकारणापेक्षा जास्त चर्चा करत असतात.नाटककाराने

२९८ □ अन्वयार्थ