पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाटककाराने काव्यात्मक भाषा आणि दैनंदिन वापरात असणारी भाषा ह्याचा सुरेख संगम केला आहे. गुरू ह्या प्रतिभावंत कलावंताच्या अंतर्मनातील द्वंद्व आणि विचार ह्यासाठी काव्यात्म भाषा आणि त्याच्या आयुष्यात घडत जाणारा बाह्य घटनाक्रम यासाठी दैनंदिन वापरातील भाषा, असे वर्गीकरण नाटकाराने केलेले दिसते. नाट्यसंहिता ही मुळात प्रयोग करण्याकरिता लिहलेली असते त्यामुळे प्रयोगाच्या दृष्टीने त्याचा विचार करणे आवश्यक ठरते. एकाच पद्धतीची काव्यात्म भाषा सातत्याने वापरली गेल्यास त्याची गोडीसुद्धा नष्ट होऊ शकते तसेच फक्त दैनंदिन वापरातील भाषा वापरल्यास नाट्यात्म उंची कदाचित कलाकृती गाठू शकत नाही. प्रयोगाच्या ह्या मर्यादा लक्षात घेता लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी दोन्ही पद्धतीच्या भाषा प्रकाराचा सुंदर गोफ यामध्ये विणला आहे.
 या नाटकाचे संवाद लिहितानासुद्धा नाटकाकाराने शब्दांचे फुलोरे असणारे संवाद लिहिण्यापेक्षा नाटकातील घटनाक्रम आणि व्यक्तिरेखेच्या मनातील स्पंदने स्पष्ट होतील अशी स्पष्टता बाळगत ते लिहिले आहेत. विशेषत: काव्यात्म संवाद प्रयोगरूपात सादर होत असताना कित्येकदा नाटककाराने वापरलेल्या शब्दांना प्रेक्षक दाद देतात. माझ्या मते ही चांगली गोष्ट नसून ती रसभंग करणारी गोष्ट आहे. अशा संवादातील शब्द कितीही उत्तम असले तरी प्रेक्षकाला ते कलाकृतीमधून बाहेर घेऊन येतात. 'अखेरची रात्र'मधील संवाद हे प्रेक्षकांना असे घायाळ वगैरे न करत बसता नेमकी मनोवस्था स्पष्ट करतात हे ह्या संहितेचे बलस्थान मानावे लागेल.

 नाट्यसंहितेत जसा आशय महत्त्वाचा असतो तसेच त्या आशयाची मांडणीसुद्धा. शोकांतिकेमध्ये प्रामुख्याने नायक केंद्रस्थानी असल्याने त्याच्याबरोबर असणारी इतर पात्रे दुय्यम ठरण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ती दुय्यम असतात. 'अखेरची रात्र'मध्ये नाटककार गुरूचे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणाऱ्या दोन स्त्रिया आणि त्याचा सहलेखक अब्बास एवढ्या चारच पात्रांवर अख्खे नाटक तोलतो. प्रेरणा आणि प्रतिभा ह्या दोघींचे अस्तित्व गुरूच्या मनात सतत एक अंतर्विरोध निर्माण करत राहातात, तर अब्बास हा त्याचा सहलेखक ह्या नाटकाचा सूत्रधार म्हणून वावरतो. प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनाक्रमातही अब्बास सहभागी होतो तो एखाद्या संस्कृत नाटकातल्या विदूषकाप्रमाणे, जो राजावर मनापासून प्रेम करतो आणि टीकाही. एका लेखकालाच सूत्रधार करून त्याला विदूषकाच्या एका आगळ्या वेगळ्या प्रकारात नाटककाराने सादर करून ह्या व्यक्तिरेखेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. बऱ्याचदा शोकांतिकेमध्ये विदूषक ह्या पात्रामार्फत कित्येकदा नाटककार स्वत:चे भाष्य करत असतो. विदूषक हा फक्त मनोरंजन करणारा नसून

अन्वयार्थ □ २९७