पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नोकरशाहीबद्दल मांडलेल्या भूमिकेचा आधार दिला आहे. भारतीय प्रशासनासंदर्भात प्राचीन काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लेखकाने स्पष्ट केली आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातून प्रशासनासंदर्भात मांडलेली भूमिका स्पष्ट करून त्यांनी असे म्हटले आहे की, कौटिल्याने आपल्या ग्रंथाचे १४ भागांत विभाजन करून राज्यातील प्रशासन कसे चालावे, याबद्दल सविस्तर मांडणी केली आहे. त्याने राज्याची सप्तांगे सांगितली आहेत. लेखकाने हे सांगतानाच मॅकॅव्हेली व कौटिल्य यांच्या विचारांचीही तुलना केली आहे. भारतातील प्रशासनाबाबत. ऐतिहासिक दाखले देताना राजा तोरडमल यांनी केलेले मुघलकालीन महसूल प्रशासनाबद्दलचे विवेचन लेखकाने केले आहे. राजा तोरडमल यांनी मनसबदारी प्रथा, न्यायदान पद्धती, जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीपद्धत आणि जमिनीचे वर्गीकरण करून कर आकारणे याबद्दलचे विवेचन केले होते.

 ब्रिटिश काळात भारतीय प्रशासनाची चौकट कशी पक्की झाली, याबद्दलचे सविस्तर वर्णन लेखकाने केले आहे. आय. सी. एस. परीक्षांद्वारा ब्रिटिशांनी भारतात प्रशासकीय सेवा सुरू केल्या. सुरुवातीला ब्रिटिश तरुणांनाच त्या सेवांत सामील होता येत होते; परंतु काळाच्या ओघात भारतीयांनाही ब्रिटिशांनी त्यात सामील करून घेतले. ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच या सेवा विस्तारल्या. वॉरेन हेस्टिंग्ज, लॉर्ड कॉर्नवॉलिस, वेलस्ली आणि मॅकॉले यांसारख्या अधिकाऱ्यांनी या सेवा मजबूत करण्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण होते. ब्रिटिश राजवटीने आपले साम्राज्य पक्के करताना भारतासंदर्भात वेगवेगळे कायदे केले. राणीचा जाहीरनामा, १८६१ कायदा, १८९२ चा कायदा व १९०९ चा कायदा या कायद्यांद्वारे केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळाचा विस्तार झाला. लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक जरी असले, तरीही १६८८ ला भारतात मद्रासमध्ये नगरपालिका स्थापना झाली होती. हा दाखला देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केले, असे मत लेखकाने व्यक्त केले आहे. ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणाऱ्या अधिकाऱ्यांनी भारतात चंगळवादी जीवन कसे व्यतीत केले, याबद्दलचे वर्णनही त्यांनी केले आहे. या चंगळवादी अधिकाऱ्यांप्रमाणे काही कर्तव्यदक्ष व कार्यक्षम अधिकारीदेखील होते. यामध्ये हंटर यांनी गॅझेटियर निर्मितीतील दिलेले योगदान, वॉल्टन जॉन खिस्ता यांनी १९४३ मध्ये इंडियन फूड डिपार्टमेंट स्थापनेतील व फाळणीनंतर दोन्ही राष्ट्रांत संपत्तीचे वितरण कसे करावे यासाठी लिहिलेले ३३ पानांचे टिपण यांतील योगदान इ. उदाहरणे दिली आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांप्रमाणेच भारतीय अधिकाऱ्यातील सत्येंद्रनाथ टागोर, गुरुदास दत्ता आणि सी. डी. देशमुख यांच्या योगदानाचे विवेचनही केले आहे.

अन्वयार्थ □ २८५