पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय प्रशासनाचे सकारात्मक विवेचन

पांडुरंग भोये


 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी भारतीय प्रशासनासंदर्भात 'साधना' या साप्ताहिकात २००९ ते २०१० या दोन वर्षांत जे लेख लिहिले, त्या ३१ लेखांचा संग्रह 'बखर : भारतीय प्रशासनाची' या पुस्तकरूपाने १ जून २०११ रोजी प्रकाशित झाला. या पुस्तकात त्यांनी भारतीय प्रशासनासंदर्भातील ऐतिहासिक पार्श्वभूमी व कार्यपद्धती, नोकरशाहीचे रूप, अमेरिका व ब्रिटनमधील नोकरशाही आणि भारतीय नोकरशाहीसमोरील आव्हाने या प्रशासनाशी निगडित बाबींवर प्रकाश टाकला आहे व प्रशासनासंदर्भात लेखकाने वेगवेगळ्या अंगांनी चर्चा केली आहे.
 पुस्तकाला बखर का म्हटले आणि या बखरीचे स्वरूप कसे आहे, याबद्दल लेखकाने सुरवातीलाच आपले मत स्पष्ट केले आहे. नोकरशाहीचा उगम आणि विकास कसा झाला याचा आढावा सुरुवातीच्या भागात घेतला आहे. भारतीय प्रशासनाचा मूळ आधार हा भारतीय संविधान हा आहे. या आधारावरच प्रशासन कसे चालते, याचे उत्तम विवेचन लेखकाने केले आहे.

 भारतीय संविधानाची प्रस्तावना, राज्यविषयक मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार हा आपल्या संविधानाची प्राणतत्त्वे आहेत. त्या आधारावर काम करणारी नोकरशाही ही राष्ट्रासाठी आवश्यक असून नोकरशाहीला मिळालेल्या अधिकारांतून तिच्यात दोष व कुरूपता निर्माण होते यावर नेमके बोट ठेवत नोकरशाहीची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली आहे. मार्क्स व वेबरने नोकरशाहीबद्दलच्या केलेल्या सैद्धान्तिक मांडणीबद्दल लेखकाने नेमकेपणाने विवेचन केले आहे. अनेक बाबतीत नोकरशाहीचे सिद्धान्त चकीचे नसून अमलात आणणारे अधिकारी व कर्मचारीही विकारपीडित आणि स्वार्थमूलक आहेत, अशी स्पष्ट भूमिका लेखकाने मांडली आहे. नोकररशाहीबद्दलचे तर्कचित्र स्पष्ट करून त्याला 'किनडे साईड' यांनी

२८४ □ अन्वयार्थ