पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

का वागतो आणि परिणाम काय होतात असे चौपदरी धागे प्रशासनातील वेगवेगळ्या सिद्धान्ताबाबत उलगडले आहेत.
 त्यापुढील भागांत देशमुखांनी अमेरिका व ब्रिटनमध्ये होत असलेल्या प्रशासकीय सुधारणांचा आढावा घेत त्यासोबत भारतीय प्रशासनातील सुधारणांची, किंबहुना सुधारणेसाठी असलेल्या चौकटीची तुलना केली आहे. आपल्याकडे अजून खूप प्रशासकीय सुधारणा होण्याला वाव आहे, नव्हे, त्यांची फार गरज आहे. तर मग काय असावी त्यांची दिशा? अमेरिका व ब्रिटन हे प्रगत देश आहेत तर भारत हा विकसनशील- म्हणजे जिथे विकास अजून व्हायचा आहे असा देश आहे. ब्रिटिशकालीन प्रशासकीय चौकटीपेक्षा महत्त्वाचा बदल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विकास करवून घेताना प्रशासनात निर्माण झालेले बदल जिल्हा परिषदा, ग्राम सभा तसेच स्थानिक आमदार व खासदार यांना असलेले वेगळे अधिकार आणि प्रशासनाबरोबर त्यांचा समन्वय कसा होतो किंवा होत नाही- या सर्व चर्चेचा एका अख्खा भाग 'आय ए एस असावे की नसावे.' या गाजलेल्या प्रश्नासाठी अपरिहार्यपणे वापरलेला आहे. त्याच बरोबर भारतीय प्रशासनासमोरील आव्हाने काय- त्यांची चर्चा देखील शेवटच्या भागांत केली आहे. देशमुखांचे लेखन आशावादी आहे व ही आशा निर्माण होण्यासारखी किंवा टिकून रहाण्याची जी कारणे आहेत त्यातील दहा ठळक कारणेही त्यांनी नोंदलेली आहेत. तरुणांमधील ऊर्जा, त्यांचा वाढता प्रोफशनॅलिझम, आणि 'यापुढे सहन करणार नाही' ही मनोवृत्ती ही तीन ठळक कारणे. या सोबत भ्रष्टाचारविरुद्धची जगजागृती, स्त्रिया तसेच दुर्गम भागातून आलेल्यांचा राजकारण आणि प्रशासनातील वाढता सहभाग, माहिती अधिकाराचा कायदा व लोकपाल विधेयक, न्यायालयांची सक्रीयता व नीतिशकुमार सारख्यांनी राजकारणातून आणलेले विकासाचे मॉडेल अशा बाबींचा समावेश त्यांनी केला आहे.

 ही पुस्तके वाचतांना देशमुखांनी स्वत: अफाट वाचनही केले आहे याचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे ते तपशिलातही जातात, विस्ताराने तपशील देतात हे ही महत्त्वाचे आहे. मग यात काही राहून गेले आहे का, हे ठरविण्यासाठी मला नील्स बोर या वैज्ञानिकाची एक गोष्ट सांगावी लागेल. काळ १९०५ च्या आसपास. एव्हाना अणूच्या रचनेत इलेक्ट्रॉन नावाचा एक ऋणभार घेतलेला घटक असतो हे निर्विवादपणे दाखवून दिले गेले होते. सबब धनभार घेतलेले घटकदेखील असणार हे उघड. तर हे दोन्ही विद्युत्भार एकमेकांना संपवत का नाहीत याचे उत्तर नील्स बोरने शोधलं. सूर्याभोवतीची जशी ग्रहमालिका- त्याचप्रमाणे जर हे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रापासून थोड्या ठरावीक अंतरावर वर्तुळाकार फिरत राहिले तर त्यांचा ऋणभार नष्ट न होता त्यांना स्थायित्व प्राप्त होते असा तो सिद्धान्त होता. अशा एका स्थायी वर्तुळावरून दुसऱ्या वर्तुळाच्या

अन्वयार्थ □ २८१