पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चा भक्कम आधार घेऊन, त्यांचे मंत्रालयात केंद्रीकरण झाले आहे. आपल्या मर्जीनुसार प्रशासन वाकविण्याचे एक साधन म्हणून बदलीचे शस्त्र सररासपणे वापरले जाते आहे हीसुद्धा आपल्या प्रशासनाची एक शोकांतिका तिचे पैलू 'प्रशासननाम्या'त जागोजागी आपल्या नजरेस पडतात.
 कित्येकदा माध्यमे काय, लोकप्रतिनिधी काय किंवा सर्वसामान्य नागरिक काय, - प्रशासकीय अधिकाऱ्याला जी तारेवरची कसरत करावी लागते त्याचे यथार्थ आकलन करून घेऊ शकत नाहीत. अनेकांच्या अपेक्षा शासकीय चौकटीत राहून, वेळापत्रक सांभाळून, पूर्ण करणे किती कर्मकठीण असते याची नेमकी कल्पना नसल्याने, त्यांचेकडून होणारे मूल्यमापन कित्येकदा सदोष असते. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत बोलायचे, तर त्यांनी आग्रह लावून धरलेल्या दहा कामांपैकी नऊ कामे मार्गी लागली तर त्याचे काही कौतुक होत नाही, पण मागे राहिलेल्या एका कामाबद्दल मात्र त्या अधिकाऱ्याला धारेवर धरले जाते, याचा अनुभव बहुसंख्य अधिकाऱ्यांना नेहमीच येतो. काही वेळा माध्यमे एखाद्या अधिकाऱ्याला वारेमाप प्रसिद्धी देऊन त्याची ‘या सम हाच' अशी प्रतिमा उभी करतात. परंतु ती प्रतिमा अवास्तव असू शकते. काही वेळा कर्तव्यदक्ष आणि मेहनती, प्रामाणिक अधिकाऱ्यावर वरिष्ठांची निष्कारण खप्पा मर्जी होऊ शकते. प्रशासकीय अधिकारी कोणकोणत्या मर्यादा पाळून आणि कोणकोणत्या ताणतणावाखाली काम करतो याची यथार्थ कल्पना वाचकांना देण्याचे मोठे कार्य लक्ष्मीकांत देशमुखांनी 'प्रशासननामा' ह्या लेखमालेद्वारे केले, हे नि:संशय; त्याकरता तरी प्रशासनातील त्यांचे सहकारी त्यांचे सदैव ऋणी राहतील.
 सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या लेखनात अभिनिवेश किंवा पक्षपात यांचा लवलेशही आढळत नाही. त्यांच्या संवेदनशील मनाला भिडलेल्या किंवा 'कलात्मक तटस्थता' भंगणार नाही याचे पूर्ण भान राखूनच, त्यामुळे अनुभवातून आलेले 'इनसाईट' कागदावर उतरवताना, त्यांचा कुठही तोल ढळलेला नाही हे विशेषत्वाने जाणवते.

 जीवनाच्या हरेक क्षेत्रात अनेक बरेवाईट अनुभव आपल्या सर्वांनाच येतात. त्या त्या वेळी आपण कधी प्रक्षुब्ध होतो, कधी हळहळतो, कधी सुखावतो तर कधी सुन्न होऊन जाते. अशा तात्कालिक भावना बाजूला सारून, त्या मूळ अनुभवाचे शांतचित्ताने विश्लेषण करण्याची आपली तयारी किंवा कुवत नसते. समजा असे चिंतन केलेच, तरी ते नेटक्या शब्दांत मांडणे फार थोड्या जणंना जमते. त्यासोठी आवश्यक ती प्रगल्भता, चिंतनशील प्रवृत्ती आणि शब्दांकनाची हातोटी हे सर्व घटक पदार्थ एकत्र आल्यामुळेच. 'प्रशासननामा' सारखे लज्जतदार

अन्वयार्थ □ २७७