पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुस्पष्ट, अचूक या प्रकारची आहे. याखेरीज इंग्रजी पुस्तकांतील ज्ञान- व्यवहाराचा त्यांनी सहजपणे वापर केला आहे. यामुळे त्यांचे प्रशासन विषयावरील लेखन हे लोकप्रशासन या विद्याशाखेला केलेले योगदान ठरते. २०१० आणि २०१३ मध्ये सामाजिकशास्त्राचा जागतिक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्या अहवालामध्ये विभाजित ज्ञान आणि बदलते जागतिक पर्यावरण या दोन मोठ्या समस्यांची नोंद केली गेली आहे. हे दोन्ही मुद्दे लक्ष्मीकांत देशमुखांनी परिचर्चेचा एक भाग म्हणून पुढे आणले आहेत. कारण विभागलेले ज्ञान आणि पर्यावरण या दोन्ही संकल्पना लक्ष्मीकांत देशमुखांनी मांडलेल्या आहेत. या अर्थाने त्यांचे काम भारतीय संदर्भातील असले तरी जागतिक सामाजिकशास्त्राला आणि लोकप्रशासन या विद्याशाखेला योगदान देणारे आहे, असे सामाजिकशास्त्राच्या जागतिक आहवालांशी तुलना करताना दिसते. त्यामुळे त्यांच्या या बखर साहित्यकृतीचे रूपांतरण भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये आणि इंग्रजी या ज्ञान व्यवहाराच्या भाषेत होण्याची गरज आहे. ही गरज लोकप्रशासनाची आहे. तशीच ती शुद्ध ज्ञानविस्तारांची देखील आहे.

अन्वयार्थ □ २७३