Jump to content

पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथा म्हणजे मखमली पलिता आहेत. कथांविषय प्रबोधनपर असूनही नीरस, विरस आणि विटलेपणाचा लवलेशही नाही.

॥२॥

 लक्ष्मीकांत देशमुखांनी दहाव्या-बाराव्या वयालाच लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या काही कथा सा. साधना, साप्ताहिक स्वराज्यमधून शालेय वयातच प्रकाशित झाल्या आहेत. पण चांगल्या संग्रहाच्या रूपात त्यांच्या कथेचे पहिले पुस्तक 'अंतरीच्या गूढगर्भी' जाने १९९५ मध्ये प्रकाशित झाले. · २००७ मध्ये ‘पाणी! पाणी', 'नंबर वन' (२००८), 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' (२०१३) अशी त्यांची आजवर प्रकाशित कथापुस्तके आहेत. या कथांचा परंपरेच्या कथेहून भिन्न असा एक विशेष आहे. परंपरेच्या कथा व्यक्तिभोवती फिरणाऱ्या, आशय वा व्यक्तिकेंद्री कथा असतात. देशमुखांच्या कथा व्यक्तिजीवनाच्या भोवती असणाऱ्या वा एखाद-दुसऱ्या व्यक्तीच्या सुखदु:खाचे चित्रण करणाऱ्या कथा नाहीत. त्या संपूर्ण गावाच्या, प्रदेशाच्या परिसरातील समस्येच्या, व्यवस्थेच्या, व्यवस्था लावणाऱ्या व्यवस्थेच्या कथा आहेत. समाजाच्या महावस्त्रावरचे हे विणकाम आहे. या लेखकाच्या कथांत येणाऱ्या व्यक्ती या घटकमात्र असतात. त्यांच्यायोगे लेखकाने सौंदर्य निर्माण केलेले आहे.
 दुसरा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे देशमुखांचे कथालेखन एकसूरी नाही. चारही संग्रहांचे विषय आणि आशय निराळा आहे. एकीचा विषय दुसरीत असे 'पाणी घालून कढीला उतू' आणलेला नसतो. समोर येणाऱ्या समस्येचा हरएक पातळीवरून शोध घेणे या ध्यासातून या कथा आपोआपच अंकुरतात. विषय वेगळा म्हणून आशयाचा वेषसुद्धा संग्रहानुसार नवा. प्रत्येक कथेत जनसमुदाय असतो, किंवा मग ती समुदायावर बेतलेली असते. 'अंतरीच्या गूढगर्भा' तून जन्मून सबंध अवनीतलात विहरणारी, व्यापक पटलावरील गाभ्याला भिडणारी ही कथा आहे.
 प्रत्येक कथापुस्तकाचा एक विषय, आशयाची अनेक आवरणे, तितकाच त्यातील साधेपणा मनाला मोहित करणारा आणि विषयाच्या अनुषंगाने त्यातील रचनाकौशल्य, कलात्मदृष्टी मनाला थक्क करणारी आहे. देशमुखांच्या या कथांच्या विषयी उदात्तीकरण करून म्हणायचे झाल्यास गद्यरूपातील भौतिक जीवनगाड्याचे (आध्यात्मिक नव्हे) सारथ्य करणाऱ्या महंताच्या कथा आहेत. कारण या कथांच्या मागील उद्देश समाजाचे मांगल्य व माणूसपणाचे हितरक्षण असा आहे. माणूस म्हणून सुसंस्कृत समाजात जगताना 'राजाला' सर्व समाजाचे दुःखकारण कळले पाहिजे. प्रजेला, समाजालाही कर्तव्यपराङ्मुख होता येत नाही. अशा प्रबोधनाच्या
२८ । अन्वयार्थ