पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि सोयिस्कर मीडियावाले यांच्यासमोर अरुणला बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखंड संघर्ष करावा लागतो. सुदैवाने त्याला मनीष दवे सारख्या नि:स्पृह व संवेदनशील कलेक्टरची साथ मिळते.
 मनीष दवे एके ठिकाणी म्हणतो, “बालकामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्रिसूत्री आहे बालक केंद्रित शिक्षण, पालक केंद्रित आर्थिक पुनर्वसन आणि मालक केंद्रित दंडशासन - यामधील फक्त पहिल्या मुद्द्यासाठी शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा कायदा आला. गरीब व दारिद्री समाजाचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा विचारही आता राजकीय - आर्थिक व्यवस्थेने मागास ठरवून सोडून दिला आहे. तर मुलांना मजुरीला लावणाऱ्या मालकांना दंड किंवा शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याकडून हप्तेबाजी करणे व सोईस्कर काणाडोळा करणे, हीच मानसिकता संबंधित अधिकाऱ्यांची दिसून येते. सत्तासोपानाच्या खेळात दुर्गाभाई स्वत:च्या राजकीय हितसंबंधांच्या जोरावर कलेक्टर मनीष दवेची बदली करतो. आणि आता एकट्या पडलेल्या अरुण पालिमकरला व्यवस्थेच्या अकराळ विकराळ हातांशी स्वत:च लढण्याची वेळ येते.
 या कथानकात अरुण दुर्गाभाईला भेटण्यासाठी त्याच्या घरी स्वत:हून जातो व त्याचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करतो- हा प्रसंग हृदयद्रावक पद्धतीने लेखकाने चित्रित केला आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा दुर्गाभाई एडस्ने बाधित झालेला असतो. अरुण त्याच्यासारख्या बाहुबलीलासुद्धा विचार करायला भाग पाडतो. दुर्गाभाई म्हणतो, "भरपूर झोकली, तरी पण टकुऱ्यातून तुझे बोल जात नाहीत. आमच्या धंद्यात परतीची वाट नाही. पुना इथं पॉवर आहे, पैसा आहे, सर्व प्रकारच्या नशेचं सुख आहे. जमेल तेवढं लुटायचं. मग मरून जायचं एडस्नं किंवा हार्ट बंद पडून. काय फरक पडतो? त्यामुळं पुनांदा ठरलंय की, म्या असंच जगणार. यातच मला गोडी आन् सुख हाय. तू माझ्याशी उगी लढू नकोस. तुला मी बर्बाद करीन. पण आज तरी तुला एक डाव माफ केलं....!"
 कादंबरीतील सामाजिक कार्यकर्ता अरुण पालिमकर ही व्यक्तिरेखा लेखकाने अत्यंत ताकदीने उभी केलेली आहे. अरुणचे बालपण, घरातील सावत्र बापाकडून झालेला छळ, घर सोडून निघून जाणे, रस्त्यावरचे जीवन याशिवाय स्वत:च बालकामगार म्हणून व्यवस्थेचा बळी ठरल्यामुळे लढाईमध्ये येणारी आत्यंतिक निष्ठा व उत्कटता यांसह अरुणची मानसिक आंदोलने लेखकाने बिनतोड उभी केलेली आहेत.<br.

 रेल्वेस्टेशनवर आश्रयाला आलेल्या मुलांसाठी रेलशाळा सुरू करणारा अरुण वेश्या व्यवसायातून मुलींची सुटका करून त्यांना आधार देणारा अरुण, विद्यमान

२६२ □ अन्वयार्थ