पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फूटपाथवर राहून पोट भरणारी, फटाके किंवा विणकाम, जरीकाम या प्रकारच्या कारखान्यांत बालमजूर म्हणून अठरा तास काम करणारी निदान २ कोटी मुले असावीत असा अंदाज आहे. शिवाय असंघटित क्षेत्रातील वीट कामगार, हॉटेल कामगार, सफाई कामगार, ऊस तोडणी कामगार याशिवाय बालवेश्या, बारबाला; सक्तीने भिकारी बनवलेली मुले, चोरीच्या उद्योगात स्मलिंगमध्ये केला जात असणारा बालकांचा वापर यांची अचूक आकडेवारी आजमितीला भारतासारख्या खंडप्राय देशात मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यातही नवीन ट्रेंडनुसार लहान मुलांना पळवून आणून विविध दहशतवादी गट त्यांना शस्त्र चालवण्याचे व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहेत. थोडक्यात, मुलांचा प्रश्न हा केवळ स्थानिक नसून तो जागतिक स्तरांवरचा गंभीर विषय आहे आणि त्याची भीषण उग्रता ही आशियाई देशांत, विशेषत: भारतात, अंगावर येण्याइतकी तीव्र आहे.
 अशा पार्श्वभूमीवर मराठीतील नामवंत लेखक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या 'हरवलेले बालपण' या अत्यंत दर्जेदार व उत्कृष्ट कादंबरीचा विचार करणे व त्यांनी या विषयाला ज्या जबरदस्त पद्धतीने वाचा फोडलेली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत केले पाहिजे.
 शिवकाशी येथील फटाक्यांच्या कारखान्यात काम करीत असताना स्फोटात भाजून निघालेला आणि त्यातून वाचलेला बारा वर्षांचा मुलगा अरुण हा भविष्यात चांगले शिक्षण घेऊन बालमजुरीच्या निर्मूलनाची शपथ घेतो व त्यासाठी स्वयंसेवी चळवळ उभी करतो. दरम्यानच्या काळात अरुण रॉकेलची हातगाडी चालवणे, बूट पॉलिश करणे, गॅरेजकाम करणे ही कामे करीत रस्त्यावरच जगतो व वाढतो. अरुण पालिमकर 'बचपन बचाव' या चळवळीतून पन्नास गावे बालमजुरीमुक्त करतो व त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणून बालहक्कांच्या संदर्भात भव्य प्रकल्पाची आखणी करतो. 'स्वप्नभूमी' - हजारो बालकांचं शिक्षण, खेळ, आरोग्य व मनोरंजनाचं स्वप्न पूर्ण करणारी स्वप्नभूमी. या प्रकल्पात त्याच्या मदतीला सक्रिय उभे राहातात फायदर मायकल गायकवाड, गावचे सरपंच लोखंडे आणि शासकीय अधिकारी कलेक्टर मनीष दवे!

 पालकमंत्र्यांच्या जवळचा असलेला रॉकेल माफिया, संघटित भिकारी व्यवसाय चालवणारा व फटाक्यांचे कारखाने बालकांच्या वेठबिगारीवर चालवणारा दुर्गाभाई आणि अरुण पालिमकर यांच्यात सुरू झालेल्या संघर्षातून कादंबरीची सुरुवात होते. फटाक्यांच्या कारकान्यात झालेल्या स्फोटांत सतरा बालमजूर गंभीर जखमी होतात व अरुण पालिमकर कलेक्टर मनीष दवेच्या सहकार्याने दुर्गाभाईला अटक करवतो. मिंधे असलेले पोलीस अधिकारी, दडपणापुढे कच खाणारे नोकरशहा

अन्वयार्थ □ २६१