पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
देशमुखांची कथा : जीवनमूल्य आणि वाङ्मयसौंदर्य
प्रा. राजशेखर शिंदे
॥ १ ॥


 लक्ष्मीकांत देशमुख हे संवेदनशील व प्रातिभ व्यक्तिमत्त्वाचे अधिकारी व प्रतिभावान लेखक आहेत. ते प्रशासनात होते. प्रचंड वेळखाऊ सेवेत असूनही त्यांनी साहित्याची निर्मिती केली. आणि तेही जीवनसंबद्ध अशा साहित्याची. प्रशासनात कल्पितकल्प साहित्याची निर्मिती (अगर वाचन करणे) म्हणजे आलेला ताण किंवा शिणवटा घालवण्याची मौज! ही मौज लक्ष्मीकांत देशमुखांना परवडणारी नव्हती. हलकेफुलके, चुरचुरीत स्वरूपाचे लेखन करून वाचकांच्या अभिरुचीची आराधना करून लोकप्रिय रंजनपर निर्मितीच्याद्वारे ललामभूत होताही आले असते. 'अंतरीच्या गूढगर्भीत' तसा सूरही त्यांना लागला होता. त्याला बहुपेडी वीण घालणे शक्य होते. परंतु ते तसे न करता ज्या उद्देशाने, प्रेरणेने मुलकी सेवेत ते गेले तो उद्देश आपल्या कार्यात, विचारात आणि कल्पनासंबद्ध निर्माणशील सृजनशील आविष्कारातूनही सफल केला. प्रशासकीय सेवा साध्य न मानता साधन बनवून जीवनानंद भोगला आणि काही कृतीशील विचारांतून जीवन आणि समाज कसे सुंदर करता येईल हे आपल्या शब्दशिल्पातून सांगितले.

 लक्ष्मीकांत देशमुखांच्या पहिल्या कथासंग्रहापासून आज उपलब्ध असणाऱ्या शेवटच्या कथासंग्रहापर्यंत आपण वाचत गेलो तर त्यांच्या कथावाङ्मयात श्रेष्ठतर अशा मानव्याचे दर्शन घडते. रोजच्या जीवनात आपण अनुभवलेले व क्षुद्र वाटणारे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. ते त्यावर आघात करत हळहळ उत्पन्न करतात. संबंध समाजाची करुणा उत्पन्न करत त्यांची कथा मानवतेचीच आराधना करते. त्यामुळे ती उन्नत आणि समाजहितैषी असल्याने ऊर्ध्वस्वल वाटते. ती उच्चतर रंजन आणि व्यापक प्रबोधन साधणारी कथा असल्याने मराठी वाङ्मयातील देशमुखांच्या या

अन्वयार्थ । २७