पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहृदय माणसाला हादरून टाकणारी कलाकृती

प्रा. अजित साळुखे

 भारतीय समाज नव्या आर्थिक परिवर्तनाकडे वेगवान वाटचाल करीत असतानाच आणि ‘सर्वांगीण विकास' व 'समृद्धी' हे मध्यमवर्गाचे स्वप्न साकार होत असताना, त्याच वेळी या संपूर्ण समाजाला भेडसावणारे प्रश्न अकराळ विकराळ स्वरूपात पुढे येत आहेत. समाज म्हणजे केवळ मध्यमवर्ग, उच्च श्रीमंत वर्ग, बडे उद्योगपती, राजकीय नेते, अंडरवर्ल्डमधील दादा, नोकरशहा यांनीच बनत नाही. उलट या सर्वांची शक्ती प्रचंड असली तरी फार मोठा जनसमुदाय परिघावर जगत असतो. गरीब, दारिद्री, अशिक्षित, आदिवासी, शेतमजूर, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला यांचा प्रत्येक दिवस नव्या जागतिक नफेखोर अर्थव्यवस्थेत नरकतुल्य अवस्थेकडे निघालेला आहे. या नरकातील सर्वात भेसूर बळी आहेत लहान मुले...! सर्व जाती-धर्माच्या अवकाशातील अत्यंत गरीब व वंचित समाजातील मुले व मुली यांना जगभर अत्यंत छळ, दमन, पीडन व लैंगिक अत्याचार यांना तोंड द्यावे लागत आहे.

 मुलांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार व त्यांचे पुनर्वसन करण्याचा विडा उचललेले भारतीय सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना नुकतेच शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. सत्यार्थी यांच्या नावाची घोषणा झाल्यावर दगडी राज्यकर्ते, वर्तमानपत्री, वाचनावर अवलंबून असलेले मध्यमवर्गीय, बातम्या 'इन्स्टंट' व ‘फास्ट' 'तयार' करण्यात माहीर असलेले पत्रकार हे अचानक गोंधळून गेले. कारण त्यापैकी बहुतेकांना कैलाश सत्यार्थी यांचे काम व त्याचा विस्तार याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती! सत्यार्थी यांनी मुलांचे आर्थिक, शारीरिक व लैंगिक शोषण तसेच मुलांची तस्करी, वेठबिगारी याविरुद्ध जगभर आवाज उठवलेला आहे व त्याविरुद्ध सक्रिय चळवळ उभी केलेली आहे. एकशेवीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात शाळेचा उंबरठा देखील न ओलांडलेली, बालपणापासूनच अनाथावस्थेत भटकणारी,

२६० □ अन्वयार्थ