पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदली झाली, तर त्याच्याजागी येणारा नवा अधिकारी हे काम पुढे चालू ठेवेलच असे होत नाही, किंबहुना द्वेषबुद्धीने अशी कामे बंदही करतो आणि त्याचे हुशारीने समर्थनही करीत असतो ही बाब इथे लेखकाने अधोरेखित केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेबाबतही असेच म्हणता येते. कायदे आणि नियम कुणाची सोय बघतात आणि कुणाला डावलतात हे या कादंबरीमध्ये अनेक प्रसंगांतून दाखवले आहे. अर्थात, याही क्षेत्रात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि पोलीस अपवादाने का होई ना, असतात आणि आपले काम ते चोखपणे करीत असतात असे प्रदीप कांबळेच्या व्यक्तिरेखेतून लेखक दाखवून देतो.
 अरुणभय्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रेलशाळा, पोलीस शाळा सुरू करणे, बालमजुरी करणाऱ्या मुलांना त्या त्या उद्योगातून सोडवून आणणे, त्यांचे पुनर्वसन करणे, शासकीय आदेशांचा पाठपुरावा करणे, मुलांच्यातल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करणे, त्यांच्या अभिनव अशा फॅशन शोचे आयोजन करणे, चर्चच्यावतीनं उदारपणे देण्यात आलेल्या इमारतीत आणि मोकळ्या जागेत 'बचपन बचाव ट्रस्ट'च्या वतीनं नर्सरी आणि के. जी. ची शाळा सुरू करणे, कचऱ्याच्या आयुष्यावर फिल्म तयार करून 'जी' पत्रकारांना दाखवून त्याद्वारा या जगाचं भयंकर रूप लोकासमोर आणणे, स्वप्नभूमीच्या मार्फत माया बेबीचा चंदा, मधू अशा एकेकाळच्या अडगळीतल्या वंचित आणि उपेक्षित मुलींच्यामधल्या कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगारक्षम बनवणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, बालवेश्यांची सोडवणूक करणे अशी कितीतरी विधायक कामे सुरू केलेली असतात. अरुण वंचितांचा आधारवड झालेला असतो. हे सारे तो निरपेक्ष आणि समर्पण वृत्तीने करीत असतो. त्यामागची त्याची भूमिका अल्बेर कामूच्या 'प्लेग' या कादंबरीतल्या नायकाप्रमाणे "What interestme is living and dying for what one loves" अशी असते. (ज्याच्यावर आपले प्रेम आहे, त्यासाठी जगणे आणि मरणे यातच मला रस वाटतो.)
 एखादा दुसरा अरुण पालिमकरसारखा नि:स्वार्थ आणि समर्पण वृत्तीचा कार्यकर्ता आणि 'स्वप्नभूमी' सारख्या संस्थेमुळे बालमजुरीचा जटिल प्रश्न सुटेल असा भाबडेपणा कादंबरीतून व्यक्त होत नाही, पण असे प्रकल्प आणि असे काम ‘पथदर्शी' निश्चित उरू शकते असा सकारात्म दृष्टिकोन ही कादंबरी दाखवते.

 मराठीमध्ये बोधवादी कादंबऱ्यांची एक दीर्घ परंपरा आहे. वि. स. खांडेकरांनी या परंपरेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, तर साने गुरुजींची 'श्यामची आई' ही कादंबरी या परंपरेतून कळस ठरली. श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांची 'हरवलेले बालपण' ही कादंबरी या परंपरेला पुढे नेणारी आणि वर्तमान वास्तवाबद्दल

२५८ □ अन्वयार्थ