पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कण्यावर विपरीत परिणाम करणारं जरीचं काम करण्यासाठी जहांगीर मालिकनं बिहारहून आणलेल्या शंभर-सव्वाशे बालकामगारांची मुंबईतून सुटका करून अरुण आणि संदीप त्यांच्या मूळगावी रेल्वेने घेऊन जातात तेव्हा तिथलं दारिद्र्य, अज्ञान आणि असाह्यता त्याना दिसून येते, चांद मुखीयासारखे मोठे दलाल, तिथल्या गरीबांना अडचणीच्या वेळी भरमसाठ व्याजाने पैसे देतात आणि त्यांची परतफेड करता न आल्याने त्या गरीबांची मुले ताब्यात घेतात आणि आणि त्यांना जरीकामासाठी मुंबईला आणले जाते, हे त्यांच्या लक्षात येते. त्या मुलांची सुटका केल्याचा आनंद असला तरी गावाकडे कामधंदा नसल्याने ही मुलं काय करणार? मग त्यांच्या कुटुंबीयांना कशी मदत होणार? अशा प्रश्नांनी अरुणच्या अस्वस्थतेत भर पडते. "क्या करेंगे घर जावे साब? यहाँ कमसे कम पेटतो भरता है," हे एका बालकामगाराचे उद्गार त्याच्या मनात उद्विग्नता निर्माण करते. भले, बालमजुरीला प्रतिबंध करणारे कायदे शासनाने केले असोत किंवा अरुण पालीमकर सारखे समाजसेवी ‘स्वप्नभूमी' च्या माध्यमातून अशा बालकामगारांचे पुनर्वसन करण्याचे, त्यांना शिक्षण देण्याचे, त्यांच्या अंगभूत कौशल्यांना विकसित करण्याचे अथक प्रयत्न करीत असोत- मूळ प्रश्न देशातल्या महाकाय दारिद्र्याचा असतो, आणि त्याचबरोबर आपल्या सामाजिक मानसिकतेच्या विकृतीचा असतो. उपभोगवादी 'आहे रे' वर्गातल्यांना त्याबद्दल फिकीर नसते, चिंता नसते. 'हरवलेले बालपण' आपले लक्ष अशा मूलभूत प्रश्नांकडे वेधते, आणि बालमजुरीमध्ये अमानुष प्रकारचे शोषण तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन ही शोषणप्रक्रिया एकूणच आपल्या समाज आणि संस्कृतीचाच अभिन्न भाग आहे की काय, असे वाटू लागते.

 या अनुषंगाने आर्थिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि शासकीय अशा विविध प्रकारच्या ज्या व्यवस्था कार्यरत असतात आणि त्यातून जे प्रश्न, समस्या निर्माण होतात, त्यांनाही ही कादंबरी स्पर्श करते, आणि त्यांची वर्तमानकालीन स्थिती-गती कशी आहे, त्यांचे स्वरूप कसे आहे हेही लक्षात आणून दिले जाते. राजकारणातल्या हितसंबंधांमुळे दुर्गाभाईसारखे गुंड निर्माण होतात आणि पोसले जातता. त्यांचा मोकाट वावर सोयिस्कररीत्या दुर्लक्षिला जातो, 'दुर्गाभाई एक व्यक्ती नाही, प्रवृत्ती' बनत त्याला शिक्षा करायची म्हटले तरी कायद्यातल्या पळवाटा कामी येतात. अशा लोकांच्या अवैध धंद्यांना राजकारण्यांचा, लोकसेवक म्हणणाऱ्यांचा असलेला पाठिंबा आर्थिक हितसंबंधातून निर्माण झालेला असतो. अशांच्यामुळे कर्तव्यदक्ष आणि कायद्याचं पालन करीत काही कृती करणाऱ्या अधिकाऱ्यांची कशी पंचाईत होते हे या कादंबरीत प्रसंगानुरूप दाखवण्यात आले आहे. शासनाने लोकांच्या कल्याणासाठी कायदे केलेले असतात आणि त्यांची

२५६ □ अन्वयार्थ