पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलं. काशिनाथ दारुडा होता, या सावत्र बापाने अरुणला रॉकेल विक्रीच्या आपल्या गाडीचे काम करायला भाग पाडले, हा रॉकेलचा गाडा 'चौधरी अँड सन्स' शी संबंधित होता. काळाबाजार करून या धंद्यातून भरपूर कमाई केली जात होती. काशिनाथ अरुणला राबराब राबवून घ्यायचा. आईला मारझोड करायचा. अरुणचे बालपण अशा विपरीत परिस्थितीत गेले. अनेक भयंकर प्रसंगांतून त्याला जावे लागले, पण याही परिस्थितीवर मात करून आणि स्वकर्तृत्वाने अरुण मोठा आला. बालमजुरी हे या देशातले एक भयानक वास्तव आहे हे त्याच्या लक्षात आले आणि म्हणूनच याच क्षेत्राच्या उद्धाराचे काम करण्याचा पण त्याने केला आणि तो धडाडीने कामाला लागला. निराधार, निराश्रित बालमजुरी करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याने एका महाप्रकल्पाचा संकल्प केला आणि त्याचे नाव 'स्वप्नभूमी' ठेवले. हा संकल्पही त्याने प्रत्यक्षात आणला आणि अनेक बालमजुरांना नवजीवन आणि नवसंजीवन दिले. हे एक असिधारा व्रत होते. अनेक आव्हाने पुन्हा पुन्हा पुढे ठाकत होती. हताश होऊन जावे असे प्रसंग येत होते. पण या साऱ्याला त्याच्यातला दुर्दम्य आशावाद पुरून उरत होता. "अनंत आमुची ध्येया-सक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला" या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींचा साक्षात आविष्कार म्हणजे अरुणभैय्याचे जीवन आणि कार्य होय. एका स्तरावर 'हरवलेले बालपण' ही अरुणच्या उदंड जिद्दीची आणि कर्तृत्वाची रोमहर्षक आणि प्रेरक कहाणी आहे.

 बालमजुरी करणाऱ्यांचे हरपलेले बालपण, करपलेले जीवन आणि सर्वांगीण शोषण पहिल्यांदाच इतक्या सविस्तरपणे आणि प्रभावीपणे मराठी कादंबरीत आले आहे. हे वास्तव संवेदनशील आणि विचारी वाचकांना अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. कँटीन, हॉटेल, गॅरेज, वीटभट्टी, फटाक्यांचे कारखाने, रॉकेलविक्री, बालवेश्यागृहे, बांधकाम, जरीचे काम, सराफी दुकाने अशा अनेक ठिकाणी ही अमानुष बालमजुरी राजरोसपणे चालू असते आणि अशा ठिकाणी या मुलामुलींचे नुसते आर्थिक शोषणच नव्हे तर लैंगिक शोषणही होत असते. बाल लैंगिकतेचे असे अनेक प्रसंग प्रस्तुत कादंबरीत चित्रित करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर या बालकांमध्येही लैंगिक विकृती कशी निर्माण होते तेही इथे स्पष्टपणे दाखवले आहे. बच्चू, अस्लम, सुकय्या, खंडू, राजू, कचऱ्या, बबन्या, लुल्ला, टिपू अशा किती तरी बालव्यक्तिरेखा या कादंबरीतून सामोऱ्या येतात, आणि त्यांच्या जगण्यातली परवड दाखवली जाते. ही मुले या व्यवसायात कुठून कुठून आली? का आली? कशी आली? अशा अनेक प्रश्नांचा वेध कादंबरीत घेतला जातो. त्यांचे कुपोषण, त्यांचे विकार, त्यांची वाढ खुंटणे, इ.वरही प्रखर प्रकाशझोत टाकला जातो. डोळ्यावर ताण देणारं आणि बसून-वाकून काम करावं लागत असल्यानं पाठीच्या

अन्वयार्थ □ २५५