पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे, पण आशय आणि विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन 'आधुनिक' आहे, मानवतावादी आहे आणि मुख्य म्हणजे आशावादी आहे. जगण्यातही 'व्यस्तता' आणि 'अर्थशून्यता' जाणवली तरी One has to create and live amidst the desert (अल्बेर कामू) अशी त्यांची भूमिका आहे. आणि आशयद्रव्य वास्तववादी आहे.
 चित्रपटामध्ये 'डाक्यूफिल्म' नावाचा एक प्रकार आहे. डाक्युमेंटरी आणि 'चित्रपटा'ला अंगभूत असणाऱ्या आवश्यक घटकांच्या 'मेळातून' फ्युजनमधून अशी फिल्म तयार केली जाते. (उदाहरणार्थ, अमोल पालेकर यांचा र. धो. कर्वे यांच्या जीवनावरचा 'ध्यासपर्व' किंवा डॉ. जब्बार पटेल यांचा यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरचा चित्रपट) कादंबरी हा अत्यंत लवचीक आणि खुला वाङ्मय प्रकार असल्यामुळे तिच्यामध्येही 'डाक्यु नॉव्हेल' असा प्रकार निर्माण होऊ शकतो असे देशमुखांच्या प्रस्तुत 'हरवलेले बालपण' या कादंबरीचे आविष्काररूप लक्षात घेता म्हणता येते. वास्तवाचे कल्पित कथेत रूपांतर करताना श्री. देशमुख यांनी बाळमजुरीला प्रतिबंध करणारे जो कायदे शासनाने केले आहेत, ज्या योजना केल्या आहेत, ज्या प्रकारचे उपक्रम प्रायोजित केले आहेत, शासकीय यंत्रणांना जे आदेश दिले आहेत. त्यांचा थेट उल्लेख केला आहे; त्यातून काय साध्य करायचे आहे, अपेक्षित आहे, याची चर्चा केली आहे; शासकीय यंत्रणेचे स्वरूप विशद केले आहे. या संदर्भात सर्वसाधारणपणे शासकीय नोकरशाहीचे स्वरूप आणि वर्तन कसे असे असते तेही निवेदनाच्या ओघात सांगितले आहे. आणि या साऱ्या समवेत कल्पितरूपातले पात्र - प्रसंग - घटना - घडामोडी इ. चे चित्रणही केले आहे. चित्रपटात ज्याप्रमाणे लाँगशॉट्स, क्लोजशॉट्स, झूम्स, व्यक्तिदर्शन, समूहचित्रण, इ. चा वापर केलेला असतो, त्याचप्रमाणे 'हरवलेले बालपण' या कादंबरीची रचना केलेली आहे. कादंबरीत कविता आहेत. गाणी आहेत, संवाद आहेत. फ्लॅशबॅक्स आहेत. आणि प्रसंगोपात्त घडामोडींविषयीची थेट भाष्येही आहेत. माहिती देणे, प्रबोधन करणे आणि जाणीव जागृती करणे अशा विविध स्वरूपात हरवलेले बालपण प्रस्तुत करण्यात आली आहे.

 अरुणभैय्या हा या कादंबरीचा नायक आहे (तसा तो लेखकाचा माऊथपीसही आहे) बालमजुरी निर्मूलन आणि बचपन बचाव हे त्याचे जीवितकार्य (मिशन) आहे आणि आपले अवघे आयुष्य पणाला लावून तो हे काम करतो आहे. या क्षेत्राची निवड करण्यामागे त्याच्यासाठी एक खास कारण आहे. लहानपणी तोही बालमजुरी करीत होता. शिवकाशीच्या फटाक्याच्या दुकानात बालमजूर म्हणून काम करीत असताना मोठा स्फोट झाला, पण सुदैवाने तो त्यातून वाचला. बाप हमाली करताना रक्त ओकून मेला आणि आई धोंडीने आधारासाठी काशिनाथशी लग्न

२५४ □ अन्वयार्थ