पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हरवलेलं बालपण कादंबरीचे वेगळेपण

अविनाश सप्रे


('डॉकु - नॉवेल' स्वरुपाची वाचकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कादंबरी)
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हरवलेलं बालपण' या कादंबरीतमध्ये 'बालमजुरी' (चाईल्ड लेबर) या समस्येचा मूलगामी वेध घेण्यात आला आहे. बालमजुरी करावी लागलेल्या मुलांच्या सर्वांगीण शोषणाचे अस्वस्थ करणारे दर्शन त्यामध्ये आहे. बालकामगारांचे दीनवाणेपण, अस्वस्थपण, गरीबपण, निराधारपण, हतबलता असाह्यता संबंध कादंबरीभर सावलीसारखे पसरून राहिले आहे. तशी लहानमुलं आपल्या अवतीभवती काही काही प्रकारचे काम करताना आपण बघत असतो (आणि त्याकडे दुर्लक्षही करीत असतो) पण बालमजुरी ही एक समस्या आहे, एवढंच नव्हे तर, एक गंभीर समस्या आहे आणि ती सर्वत्र आहे याचे भान ही कादंबरी सुजाण आणि संवेदनशील वाचकाला घडवते.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत राहिले. व्यवस्थेत राहूनही कल्याणकारी परिवर्तन करण्यासाठी अखंडपणे, आणि प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहिले. आपल्या कार्यकाळात नानाविध प्रकारचे जे बरेवाईट अनुभव त्यांना आले, ते त्यांच्यातल्या सर्जनशील दृष्टीने टिपले आणि अक्षरबद्ध केले. त्यातून त्यांच्या साहित्यसंपदेला अधिकृतता प्राप्त झाली. अनुभवांना कल्पकतेने कल्पितामध्ये (फिक्शनमध्ये) रूपांतरित केल्यामुळे त्यांना वाचनीयता प्राप्त आली; आणि "What we thought but never expresse so well" (पोप) असे त्यांना स्वरूप प्राप्त झाले. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या इतर कथा । कादंबऱ्याप्रमाणेच 'हरवलेले बालपण' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या कादंबरीतूनही याचा प्रत्यय येतो.

 श्री. देशमुख यांची लेखक म्हणून असलेली कथनपद्धती तशी पारंपरिक

अन्वयार्थ □ २५३