पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तशा अर्थाने ही कादंबरी म्हणता येणार नाही, कारण तिचा पट विस्तीर्ण आहे व त्यानुसार लेखकाने अजून परिश्रम घेतले असते तर याहीपेक्षा उत्कृष्ट व तपशिलांचा वेध घेणारी कादंबरी देशमुखांसारख्या प्रतिभावंत लेखकाला शक्य झाली असती. कादंबरीतील मित्रा, करण व रुक्मीसहित इतर स्त्री प्रतिमांच्या मानसिक आंदोलने व प्रकटीकरण याला अधिक वाव देणे अपेक्षित होते. आनंद पाटील व भगवान काकडे या दोघांची द्वंद्वात्मक अशी ही कादंबरी असून गोविंद निहलांनी यांच्या गाजलेल्या 'अर्धसत्य' या चित्रपटाची आठवण करून देते. आजच्या काळातील महसुली व्यवस्थेच्या चक्रातील आरे म्हणून काम करणाऱ्यांसमोरील आव्हाने, मोह व असाहाय्यता यांचे अंगावर येणारे चित्रण करणारी, आशा-निराशेच्या गर्तेत हिंदकाळे घ्यायला लावणारी आणि अखेरीस शोकांतिकेचे दर्शन झाल्यामुळे सुन्न करणारी ही महत्त्वाची समकालीन कादंबरी आहे.

२५२ □ अन्वयार्थ