पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बिनधास्त व फटाकडी आणि सुंदर असलेली निशा व तारुण्याच्या उंबरठ्यावरील आनंद यांना एकत्र शिकता शिकता आलेल्या जवळीकीतून जबरदस्त आकर्षण निर्माण होतो. या कोवळ्या प्रेमसंबंधाचे चित्रण लेखकाने अत्यंत भावस्पर्शी व तरलपणे केलेले आहे. मेडिकलचे स्वप्न पाहाणारा आनंद निशाच्या रोजच्या भेटीगाठीतून अभ्यासातून हद्दपार होत जातो. तर निशाला पोलीस अधिकारी असलेले वडील कुठेही डोनेशन देऊन मेडिकलला प्रवेश घेऊन देतील, हे माहीत असते व त्यामुळे ती बिनधास्त असते.
 बारावीच्या परीक्षेचे निकाल धक्कादायक लागतात व प्रेमात गुरफटलेले दोघेही जीव कसेतरी पास होतात व मेडिकलचे स्वप्न धुळीला मिळते. निकाल लागल्यानंतर आनंद व निशा यांची चर्चा आदर्शवादला तिलांजली देऊन भ्रष्टाचारी व्यवस्थेचा उघड उघड स्वीकार करण्याकडे जाते. सध्याच्या तरुण पिढीची भाषा लेखक निशाच्या तोंडून व्यक्त करतो. “तू आदर्शवादी आहेस, नैतिकता मानतोस. पण आनंद, आज जगात या दोन्ही गोष्टी आऊटडेटेड झाल्या आहेत. ज्याला तू व तुझे पप्पा आदर्श मानत होतात, त्या कलेक्टरांचे पायही मातीचे निघाले. तुझ्या पप्पांनीही कलेक्टरांप्रमाणे व्यवहार पाहून तडजोड स्वीकारली असती तर ते इथंच राहिले असते व तेही मालामाल झाले असते. आदर्शाना आजच्या जगात स्थान नाही.' भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेला हा अखेरचा बळी म्हणजे पुढची पिढी. व्यवहारी जगात टिकण्यासाठी 'वाटेल ते' करण्याची तयारी व कुठलेही बंधन झुगारून देण्याची इच्छा यातून आनंद काकडे त्याच्या आदर्शवादी पित्याचे, भगवान काकडेचे, मतपरिवर्तन करतो. एकेकाळी करप्ट म्हणून बापाचा द्वेष करणारा आनंद आता पुन: सदाचाराची वाट चोखाळलेल्या बापाला निशाबद्दलचे आकर्षण व खाजगी कॉलेजमध्ये मेडिकलला प्रवेश घेणे यासाठी भ्रष्टाचारी बनण्यास स्वत:च प्रवृत्त करतो ही शोकांतिका कादंबरीत विलक्षण पद्धतीने समोर येते. तर भ्रष्ट व्यवस्थेतून सर्व प्रकारच्या अपराध भावनेने निराश झालेला कलेक्टर आनंद पाटील राजीनामा देऊन बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करतो!

 अशा प्रकारे ओघवत्या भाषेत विद्यमान समाजव्यवस्थेतील आंतरिक हितसंबंधांचे जाळे, शासन व प्रशासनातील बारकावे, मानवी भावभावनांचे हेलकावे हे तरल पद्धतीने मांडत लेखक लक्ष्मीकांत देशमुख वाचकाला आपल्या सोबत घेऊन जातात. विचार करायला, अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. या घडामोडी जरी एका उस्मानाबाद जिल्ह्यातील दाखवल्या असल्या तरी त्या संपूर्ण भारतीय वास्तवाचेच चित्रण करतात. समकालीन लिहिणे हे सर्वात अवघड काम असते, मात्र लेखक त्यात कमालीचा यशस्वी झालेला आहे.

अन्वयार्थ □ २५१