पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आदर्श कलेक्टर आनंद पाटील व व्यवहारी' पोलीस अधीक्षक मराठे यांच्यामध्ये कॉलेजकन्येचा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग करणाऱ्या पोलिस निरीक्षक गायतोंडेची केस उभी राहते. मुलीला खरोखरीच विनयभंग व मारहाण करणाऱ्या गायतोंडेच्या पाठीशी मराठे उभे राहतात, कारण तो त्यांचाच 'माणूस' असतो. शिवाय गायतोंडेचे मंत्रीपातळीवर संबंध असतात. भ्रष्टाचाराच्या साखळीच्या जोरावर जिल्ह्याचा प्रमुख एक पोलीस निरीक्षकामुळे हतबल होतो. स्वच्छ असलेल्या भगवानला निलंबित करणारा आनंद पाटील खरोखर भ्रष्टाचारात लडबलेल्या अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई करू शकत नाही. तो म्हणतो “ 'भ्रष्टाचार' हा परमेश्वराप्रमाणे शासनात सर्वत्र पसरलेला आहे. आपण फक्त आपल्याच प्रामाणिकतेचा हवाला देऊ शकतो. इतरांवर आपल्या सच्च्या वर्तनानं थोडंफार नियंत्रण ठेवू शकतो इतकंच. मात्र हा भ्रष्टाचार उखडून टाकणं सर्वस्वी अशक्य आहे."
 अशाप्रकारे मूळ आदर्शवादी असलेला आनंद पाटील काळाच्या ओघात भ्रष्टाचाराच्या - ऑक्टोपसच्या वर्चस्वाला मान्यता देऊ लागतो. अपराध बोच व भ्रष्टाचाराची अपरिहार्यता यांच्या कोंडीत सापडलेल्या आनंद पाटीलची व्यक्तिरेखा लेखकाने ताकदीने उभी केलेली आहे. प्रत्यक्ष पैशांच्याद्वारे भ्रष्टाचार न करणारा आनंद उत्तरकाळात पालक मंत्र्याच्या मेहुण्याने गिळलेली शासकीय जमीन नियमित करण्यासाठी व स्वत:च्या मुलांची शैक्षणिक कारकिर्द बिघडू नये म्हणून बदली टाळण्यासाठी भ्रष्टाचाराला पाठिंबा देतो व कादंबरीतील समांतर नायक • आता मंडलनिरीक्षक असलेला - भगवान काकडे याचा बळी देतो! आनंद पाटीलची भ्रष्टाचाराच्या अक्राळविक्राळ ऑक्टोपस समोर सुरू झालेली ही अंतिम घसरण असते!

 गिरदावर म्हणून पुनर्स्थापित झालेला भगवान काकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची रात्रंदिवस सरबराई करणे, त्यांना सर्व प्रकारच्या दारू, मटण, तमाशा, बाया इ. सुविधा पुरवणे याला विटून स्वत:ची बदली करून घेतो व पुनश्च आदर्शवादाची वाटचल सुरू करतो. जो आदर्श होता त्याचे अध:पतन व जो पूर्ण वाया गेलेला होता त्याचे ऊन्नयन लेखकाने उत्कटपणे मांडलेले आहे. परंतु आता कादंबरीतील पुढची पिढी या नाट्यात अवतरते. आनंद पाटीलचा मुलगा करण, भगवान तलाठीचा मुलगा आनंद व पोलीस अधीक्षक मराठे यांची मुलगी निशा एकाच वर्गात शिकत असतात. बुद्धिमान असलेला आनंद काकडे जिल्ह्यात सर्वप्रथम येतो, निशा तिसरी येते व करण पाचवा येतो. वडिलांप्रमाणे करण आय. ए. एस. परीक्षेसाठी कला शाखेत प्रवेश घेतो तर आनंद व निशा मेडिकलला जाण्यासाठी सायन्सला प्रवेश घेतात.

२५० □ अन्वयार्थ