पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काकडे, जो वडिलांच्या Love - hate Relationship मध्ये सापडलेला असतो, जो संघाचे कथित आदर्शवादी विचार बाळगून मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन नंतर गरिबांच्या सेवेचे स्वप्न पाहात असतो, त्याच्या अध:पतनाची, स्वप्नभंगाची दुर्दैवी कहाणी देशमुखांनी अत्यंत तरलपणे साकारलेली आहे.
 आनंद पाटील हा ध्येयवादी व मध्यमवर्गीय तरुण सुरुवातीस प्रांताधिकारी म्हणून हजर होतो व पदावरील नवीन अधिकारी असतानाच लाखांचा भाविक जमाव व मूठभर पोलिस यांच्यातील बाचाबाचीतून उद्भवलेल्या दंगलीचा अत्यंत संवेदशील व जबबादार पद्धतीने गोळीबार होऊ न देता लाखोंचा जमाव नियंत्रणात आणतो व त्या दिवसापासून त्याची कीर्ती वाढू लागते. त्याच भागात तलाठी असलेला भगवान काकडे हा आदर्श तलाठी म्हणून नावारूपास येतो व दोघांचे स्नेहसंबंध जुळतात. भगवान काकडे हा ध्येयवादी साहेब आनंद पाटील यांचंच नाव स्वत:च्या मुलाला ठेवतो.

 सामाजिक वनीकरणामध्ये, कुटुंबकल्याण योजना व अल्पबचत या क्षेत्रांमध्ये पुढाकार घेऊन भरीव कामगिरी करणारा भगवान काकडे हा एक आदर्श व स्वच्छ तलाठी म्हणून काम करत असतो. परंतु एक दिवस लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे भगवान काकडेला फेरपाराच्या नोंदीसाठी चारशे रुपयांची लाच घेताना अटक होते. आनंदला या गोष्टीचा धक्का बघतो. भगवान काकडे पुन:पुन्हा विनवून सांगतो की मी कुठलीच लाच घेतली नाही व हा केवळ एक सापळा आहे. तरीही तहसीलदार पाध्येच्या रिपोर्टवर पूर्ण विश्वास ठेवून आनंद स्वत:ची आदर्श प्रतिमा जपण्यासाठी काकडेला निलंबित करतो. एम. ए. मराठी झालेला, वाचनाचे वेड असलेल्या काकडेला खितपत पडावे लागते. त्याची भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असलेली बायको भागीरथी, काकडेला सोडून टग्या पुढारी खंदाडेची रखेल म्हणून राहू लागते. भगवान काकडेचा मुलगा आंदू हा काकडेचा विलक्षण द्वेष करू लागतो. काकडेची केस ही खोटी असते व त्याच्या दुर्दशेला आपण कारणीभूत झालो ही अपराध भावना कलेक्टर आनंद पाटीलला छळत राहते. दुसऱ्या बाजूला काकडे व्यसनाच्या आहारी जातो. बायको सोडून गेलेली, मुलगा द्वेष करणारा अशा स्थितीत काकडेच्या गावातली जुनी मैत्रीण रुक्मी हे पात्र त्याला दिलासा देण्यासाठी अवतरते. दैववशात् रुक्मीचे भरपूर धिंडवडे निघालेले असतात व ती वेश्या बनलेली असते. भगवान काकडेला रुक्मी मानसिक आधार देते, इतकेच नव्हे तर काकडेच्या मुलाला आईसमान वागणूक देते. भगवान काकडेच्या जीवनातील उलथापालथ आणि जिवापाड प्रेम असलेला त्याचा मेरिटमधला मुलगा आंदू तसेच रुक्मी ही पात्रे अत्यंत ठसठशीतपणे डोळ्यांपुढे उभी राहतात.

अन्वयार्थ □ २४९