पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्री मृत्यूला किती बेडरपणे सामोरी जाते, हे इथे शेवटपर्यंत पाहा.' असं ऐकवून मृत्यूला कवटाळते.
 या अफगाणी स्त्रियांबरोबर लेखकानं रेखाटलेली अन्वरची रशियन पत्नी तान्या उर्फ तराना ही एक विलोभनीय व्यक्तिरेखा, अन्वराच्या प्रेमात आकंठ बुडून अफगाणिस्तानला मातृभूमी आणि इस्लामला आपला धर्म म्हणून स्वीकारणारी, तान्याची झालेली ही तराना! कादंबरीच्या शेवटी तिने आपल्याशी केलेला प्रेमविवाह हा के. जी. बी. या रशियन गुप्तहेर संघटनेचा आदेश होता हे सत्य उघड झाल्यानं अन्वर कोलमडतो आणि अन्वरबरोवरील वैवाहिक वाटचालीत खरोखरच त्याच्यावर अलोट प्रेम करायला लागलेली तान्या त्याच्यावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी मरण कवटाळते. अशा एक ना अनेक व्यक्तिरेखांच्या आयुष्याच्या अनुषंगाने देशमुखांनी या कादंबरीत मानवी नातेसंबंधांच्या गुंत्यांचे गहिरे रंग भरले आहेत.
 तान्याच्या व्यक्तिरेखेतून सत्तेच्या खेळात मानवी नाती ही आपल्या मर्जीनुसार बेतून त्यांना कळसूत्री बाहुल्या बनवण्याचा प्रयत्न जागतिक महासत्ता कसा करतात, हेही आपल्यापुढे येतं. तरुणपणातील अमेरिकेच्या वास्तव्यात एका धनाढ्य व्यक्तीमुळे गामवलेली अमेरिकन प्रेयसी प्रा. अमीनना परत मिळवून देण्यासाठी त्या व्यक्तीच्या खुनाचा सी. आय. ए. ने. रचलेला बनाव हा भाचाच एक पुरावा. महासत्तांच्या मदतीनं मिळवलेल्या सत्तेला आणि ती मिळवणाऱ्या सत्ताधीशाला जनमानसाच्या हृदयांत स्थान मिळत नाहीच; परंतु सत्ता टिकवण्यासाठी आणि महासत्तांचे राजकीय, आर्थिक स्वार्थ साध्य करण्यासाठी आपल्याच जनतेवर अत्याचार करून असंतोषाचा आवाज चिरडण्याची वेळ येते, हे सत्य यातून लक्षात घ्यायला हवं. त्याचबरोबर अशी सत्ता उलथवल्याशिवाय जनता राहात नाही, हेही विसरून चालणार नाही. परंतु अशा वेळेला जनताही तितकीच क्रूर बनू शकते. कादंबरीत सक्तीनं प्रौढ साक्षरता वर्ग चालवणाऱ्या आणि अफगाणी स्त्री-पुरुषांना तुच्छतेनं वागवणाऱ्या रशियन शिक्षिकेवर पुरुषांनी केलेला सामूहिक बलात्कार, तिच्या नवऱ्याची केलेली खांडोळी आणि या बलात्काराला आपल्या नवऱ्यांना प्रोत्साहन देत शेवटी स्त्रियांनी तलवारींनी केलेली तिची हत्या हा प्रसंगच अंगावर शहारे आणणारा आहे. उन्मत्तपणे सत्ता गाजविणाऱ्यांबद्दलचा सूड घेताना जनता पाशवी उन्मादानं कशी बेहोष होते हेच यातून दिसतं. इथेच महात्मा गांधीची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पाशवी उन्मादांच्या आहारी न जाता, माणसातील माणूसपण टिकवून जनता परकीय सत्ता उलथवून टाकू शकते हा विश्वास त्यांनी जगाला दिला, ज्याचा विसर जगाला आणि दुर्दैवानं आपल्यालाही आज पडला आहे.

 अशा अनेक राजनीतिक सत्त्यांसाठी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' चा संदर्भ

अन्वयार्थ □ २४१