पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काल्पनिक व्यक्तिरेखांच्या अक्षांभोवती ही कादंबरी खऱ्या अर्थानं फिरत राहते. या दोन काल्पनिक व्यक्तिरेखांच्याभोवती त्यांच्या कुटुंबाचा भाग बनून इतरही अनेक व्यक्तिरेखा येतात. या सर्वच काल्पनिक व्यक्तिरेखांचा ऐतबार लेखकानं प्रस्तावनेत केलेला असूनही कादंबरीच्या प्रवाहाचा त्या एक अविभाज्य भाग बनतात आणि वाचकालाही गुंगवून टाकतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवाद आणि इस्लाम या दोन्हीची अन्वर आणि करीमुल्ला यांच्या व्यक्तिरेखांच्या आधाराने लेखकाने केलेली परखड चिकित्सा, इस्लामची चर्चा हा यातील सर्वात नाजूक भाग. देशमुखांनी कादंबरीतील विविध व्यक्तींमध्ये घडणाऱ्या संवादरूपाने ती अशा पद्धतीनं केली आहे, की इस्लामच्या जाणकारालाही तिची दखल घ्यावीशी वाटावी; आणि सर्वसामान्य वाचकालाही खिळवून ठेवणारी वाटावी. कोणत्याही तत्त्वज्ञानाचं टोक हे तीक्ष्णच असतं. ते माणसाला अतिरेकाकडे नेतं आणि शेवटी माणसाचंच रक्त मागतं! आणि म्हणूनच कादंबरीच्या शेवटी करीमुल्ला अन्वरला म्हणतात, “तुझा इन्किलाब आणि आमचा जिहाद यांच्या मधला मार्ग...... उदारमतवादी इस्लामी लोकशही.... हाच खरा मार्ग.... त्यासाठी नव्यानं लढायला तयार झालं पाहिजे... तरच मादरे वतनमें चैन अमन येईल.....

  या कादंबरीचं आणखी एक बलस्थान म्हणजे त्यातील स्त्रियांच्या व्यक्तिरेखा. यातील डॉ. अनाहिता ही वास्तव तर सलमा, जमिला या काल्पनिक. या सर्वच स्त्रिया अत्यंत बद्धिमान, स्वतंत्र आधुनिक विचारांच्या, इस्लामची गुलामी झुगारणाऱ्या आणि त्याचबरोबर आपल्या मातृभूमीवर प्रेम करीत, समर्थ राजकीय नेतृत्व करणाऱ्या; वेळप्रसंगी बलिदानास सज्ज असलेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांच्या बरोबरीने त्या 'कॉग्रेड' च्या भूमिकेत वावरतात. त्याचबरोबर भावनिक नात्यांसाठी नैतिकतेची रूढ बंधनंही झुगारतात आणि वेळप्रसंगी वास्तवाला कठोरपणे सामोरे जाऊन त्याचे परिणामही भोगतात. यातील जमिला ही तर प्रतिभावंत कवयित्री, जी पुढे कम्युनिस्ट राजवटीत केन्द्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचते, तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर झाकीर धार्मिक अतिरेक्यांकडे ओढला गेल्यानं पुरोगामी जमिला त्याचा त्याग करते. पण तालिबानी राजवटीत जमिलावर बलात्कार करूनही तिच्यावर पुरेसा सूड उगवला गेला नाही असं वाटून ईर्षेनं तिच्याविरुद्ध व्यभिचारांचा खोटा बनाव झाकीर रचतो आणि मौलवींतर्फे जमिलाला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देववितो. धर्माचा पवित्र झेंडा खांद्यावर घेणारे धर्माच्या नावाखाली सैतान कसे बनतात याचा 'झाकीर' हा प्रतीकात्मक नमुनाच! मानवी इतिहासात सर्व धर्मांच्या कडव्या अनुयायांनी ही सैतानी वृत्ती दाखवली आहे. जमिला मात्र निर्भयपणे शिक्षेला सामोरं जाते. इतकेच नाही तर जमावाला, “आधुनिक तालमीत तयार झालेली माझ्यासारखी

२४० □ अन्वयार्थ