पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशक्य वाटावं. यातील ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्यांच्या राजकीय वाटचालीला आणि तत्त्वज्ञानाला न्याय देऊन रेखाटणं हे एक आव्हानच हातं. १९१९ साली इंग्रजांविरुद्ध लढून अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणारा आणि पुरोगामी विचारांची किंमत मोजून १९२९ नंतर इटलीत निर्वासिताचं जीवन जगणारा अमीर अमानुल्ला आणि राणी सोरय्या, १९३३ पासून अफगाणिस्तानचा असलेला बादशहा जहीरशहा, त्याला रक्तहीन क्रांतीत पदच्युत करून १९७३ मध्ये राष्ट्राध्यक्ष झालेला राजांचा पंतप्रधान व चुलतभाऊ जनरल दाऊदखान, १९७८ मध्ये जनरल दाऊदखानला हटवून 'सौरक्रांती' यशस्वी करणारा जनरल अब्दुल कादीर आणि त्यानंतर आलेल्या कम्युनिस्ट राजवटीत राष्ट्राध्यक्ष होणारा, समाजवादी राजवटीची स्वप्ने पाहणारा नेता व प्रतिभावंत लेखक तराकी; १९७९ मध्ये तराकीला मारून राष्ट्राध्यक्ष होणारा अतिमहत्त्वाकांक्षी प्रा. अमीन, त्यानंतर थोड्याच दिवसांत सौरक्रांतीशी प्रतारणा करणाऱ्या अमीनला रशियाच्या मदतीनं पदच्युत करून राष्ट्राध्यक्ष झालेला, मार्क्सवादी पक्षाचा मूळचा आधारस्तंभ आणि १९८६ मध्ये डॉ. नजीबुल्लाकडे सत्ता सोपवून विजनवासात जाणारा करमाल, कम्युनिस्ट राजवटीचा अंत करून मुजाहिदीनांच्या काळात राष्ट्राध्यक्ष झालेला प्रा. रब्बानी आणि शेवटी तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला उमर. अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा लेखकाने समर्थपणे रेखाटल्या आहेत. राष्ट्रप्रेम, राजकीय तत्त्वज्ञानावरची निष्ठा आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा या तीनही गोष्टी सत्तेच्या उलथापालथीत कमी अधिक भूमिका कशी बजावतात आणि आपली राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी राजकीय नेते किती निघृण वागू शकतात याचं स्तंभित करणारं दर्शन यात घडतं. त्याचबरोबर धार्मिक मूलतत्त्ववादी जेव्हा राजकीय सत्ताकांक्षेने पछाडतात, तेव्हा तर ते किती हिंस्र आणि क्रूर बनतात, सर्व मानवी नीतिमूल्ये कशी पायदळी तुडवतात याचंही भीषण दर्शन घडतं. या सर्व राजकीय सत्ता - आकांक्षांमध्ये रशिया आणि अमेरिकेसारख्या महासत्तांचे स्वार्थ मिसळतात तेव्हा तर राजनीती अमानवी चेहराच धारण करते. परक्या महासत्तांच्या आधाराने होणाऱ्या सत्ताबदलात सर्वसामान्य जनतेच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब कधीच उमटत नाही. आणि देशातील आम जनतेला अशा राजवटी परक्याच वाटत राहतात, हे एक कटू ऐतिहासिक वास्तव या व्यक्तिरेखांच्या अनुषंगानं आपल्यापुढे येतं. ही सर्व वास्तवं आपल्या देशापुढे वाढून ठेवलेल्या भविष्यातील धोक्यांची पूर्वसूचनाच देत आहेत, असंही वाटून जातं.

 प्रत्यक्षात इन्किलाबचा साक्षीदार आणि मार्क्सवादाच्या मानवी चेहऱ्यावर अढळ श्रद्धा ठेवणारा अन्वर पगमनी आणि जिहादचा तात्त्विक पाया रचणारा, पण इस्लामधील मानवी मूल्यंवर गाढ श्रद्धा ठेवणारा प्रकांड पंडित करीमुल्ला या दोन

अन्वयार्थ □ २३९