पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 तराना ऊर्फ तान्या ही अन्वरची बायको. ती अन्वरच्या प्रेमासाठी रशिया सोडून अफगणिस्तानात येऊन राहते. मात्र आपण के. जी. बी. ची गुप्तहेर आहोत हे अन्वरपासून लपवते. अन्वर आणि तरानाचे धर्मविषयक विचार थोडक्यात पाहू. तरानाशी लग्न केल्यानंतर लवकरच अन्वरची काबूल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती होते. तेथे रुजू झाल्यावर तरानाशी गप्पा मारताना अन्वर म्हणतो, “तान्या, मला आता खरंच धर्म ही संकल्पनाच निरर्थक वाटू लागली आहे. मार्क्स म्हणाला ते खोटं नाही. धर्म ही खरंच अफूची गोळी आहे!" त्यावर तराना म्हणते, “मी तर साम्यवादी देशात वाढलेली आहे. आमची पूर्ण जीवनपद्धती या सूत्राभोवती गेल्या चाळीस वर्षांत विकसित झाली. 'चर्च हटाव' ची मोहीम स्टालिननं राबवली खरी, पण महायुद्धाशी सामना करताना त्यालाही चर्चचा आधार घ्यावा लागला. आणि म्हणूनच मला वाटतं, मार्क्सवादी असूनही धार्मिक राहता येतं.... धर्माचा मार्क्सने व्यापक अर्थाने विचार केला नव्हता. तो फक्त संस्थात्मक धर्माचा विचार करीत होता. पण याहून उच्च प्रतीची धार्मिक बुद्धी असू शकते, नव्हे आहे, असं माझं मत आहे." यावर आजच्या विज्ञानयुगात इहवादच युगधर्म बनतोय, या अन्वरच्या मतावर तराना पुढे बोलते, “पण माणसाचं एवढ्यानं भागत नाही, अन्वर. माणसाला विश्वाच्या व मानवी व्यक्तिमत्त्वाच्या समग्र स्वरूपाचं एक चित्र हवं असतं. असं चित्र बनविण्याची त्याची खोल प्रवृत्ती असते आणि या चित्राच्या संदर्भात कशा रीतीनं जगलं असता खरंखुरं साफल्य मिळतं हे त्याला समजून घ्यायचं असतं. इहवादी विचारसरणीला असं समग्र चित्र बनविता येत नाही." या तरानाच्या विचारावरून ती धर्म आणि मार्क्सवादी भूमिकेचा समन्वय साधू इच्छिते हे दिसून येते. ती अन्वरच्या आई-वडिलांच्या इच्छेखातर धर्मांतर करते. अन्वरला तिच्या धर्मांतराची कल्पना रुचत नसते. यावर ती जे विचार प्रकट करते त्याला सारांश असा - हजरत महंमद हे शेवटचे प्रेषित आहेत अशी सर्व मुस्लिमांची जी श्रद्धा आहे ती योग्याच आहे. इस्लाममधीलही 'खातमुल नबुवत' ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यानुसार येशू व ज्यू धर्माचा मोझेस हे एका परीने इस्लामचे प्रचारक आहेत. याचा अधिक अर्थ स्पष्ट करताना तराना म्हणते, “मानवजातीच्या विकासासाठी परमेश्वराने अनेक प्रेषित पाठविले पण प्रेषितांचे संदेश लोक स्वार्थासाठी उलटे सुलटे करीत. म्हणून अलम माणूस-जातीसाठी परमेश्वरानं शेवटचा एक प्रेषित पाठवला. हे शेवटचे प्रेषित म्हणजे हजरत मोहमद पैगंबरसाहेब! ते शेवटचे प्रेषित असल्यामुळे पवित्र कुराणात काही बदल होऊ शकत नाही. ज्यू व ख्रिश्चन हे इस्लामपूर्व धर्म आणि मोझेझ आणि येशू हे त्यांचे प्रेषित; पण परमेश्वरी संदेशात गढूळता आली म्हणून शेवटी महंमद पैगंबरांना पाठवलं. म्हणून पवित्र कुराण हा

अन्वयार्थ □ २२९