पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विचारतो. त्यावर करीमुल्ला संभ्रमित होतात. इस्लाममधील बहुपत्नीत्वाची पद्धत अन्वरला काळानुरूप अयोग्य वाटते. परंतु धर्माज्ञा म्हणून इस्लामी जनता तिला मानते हे त्याला खटकते. अन्वर तर्कनिष्ठ पद्धतीने आपले म्हणणे मांडत राहतो. तो म्हणतो, “सर, प्रत्येकाला धर्म हा लागतोच, त्या अर्थानं मीही धार्मिक आहे. मुसलमान आहे. आपला धर्मग्रंथ अनेक बाबतीत प्रगतीशील आहे. त्यानंच मानवी इतिहासात प्रथम स्त्रीला मालमत्तेचे अधिकार दिले आहेत. तरीही आज ज्या वेगानं जग बदलत आहे, त्याच्याशी आपण मिळत जुळतं घेऊ शकत नाही, कारण डोक्यावर धर्मग्रंथाचं ओझं आहे. प्रत्येक बाबीसाठी कुराण - हदीसचा आधार घेण्याचा अट्टाहास का? धर्माचं खरं महत्त्व आहे, माणसाची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी, पण आधुनिक काळात राजसत्ता व धर्मसत्ता अलग झाली आहे. युरोपात हेच घडलं आहे, तुर्कीमध्ये केमाल पाशानं हाच प्रयत्न केला आहे. आपला शेजारी पाकिस्तान इंग्रजी शिक्षणाने काही प्रमाणात तरी आधुनिक होत आहे ..... जनाब तराकी वा आमचा हाच दृष्टिकोन आहे की, आम्हाला अवामची जिंदगी बेहतर करायची आहे. त्यासाठी प्रत्येक बाबीसाठी कुराणे शरीफ वा हादिसकडे धाव घेण्याची गरज नाही. धर्माचं स्थान उपासनेसाठी व आध्यात्मिक भुकेच्या पूर्तीसाठी महत्त्वाचं आहे, हे आम्हीही अमान्य करीत नाही." यावर अन्वरच्या तर्कशुद्ध प्रतिपादनाचं कौतुक करीत आपलाच मुद्दा पटवत राहतात व शेवटी म्हणतात. 'अन्वरभाई, मलाही अवामची प्रगती हवी आहे, तुझ्या मार्गानं नव्हे, तर इस्लामच्या चौकटीत. मला खात्री वाटते की, ती मुमकीन आहे.” (पृ. ८१,८२) यावर अन्वर हतबुद्ध होतो. या ठिकाणी करीमुल्ला हे प्राध्यापक असूनही धर्मभावनेच्या जोखडातून बाहेर येऊ शकत नाहीत असे दिसून येते. यावरील "कमी बुद्धीच्या कर्मठ मौलवीशी साधा संवादही शक्य होणार नाही. अवामला प्रागतिक विचार समजणं सोडा, त्यांच्यापर्यंत आपण पोचूही शकणार नाही." हे अन्वरचे भाष्य वाचकाला खूप अंतर्मुख करणारे आहे. हेच प्रा. करीमुल्ला युनोच्या आश्रयाला असलेल्या नजीब यांना तालीबान सैनिक निघृणपणे मारताना पाहून आणि समस्त स्त्रीवर्गाला घर आणि बुरखा यांच्यात डांबलेले पाहून तालीबानशी नातं तोडून टाकताना आपली बहू बेनझीरला म्हणतात, “बेटी, मी आजपासून तालिबानशी नातं तोडून टवकत आहे. त्यांच्या इस्लामसंमत नसलेल्या कृत्यांबाबत आवाज उठवेन. त्यासाठी लेखणी चालवेन ....!" आणि कादंबरीच्या शेवटी जमिलाला तालिबानी कायद्याने जमाव ठार मारतो त्यावेळी प्रा. करीमुल्ला पूर्ण बदलतात आणि तालिबानींच्या विरुद्ध लढायला सिद्ध होतात. प्रा. करीमुल्ला यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास लेखकाने कौशल्याने वर्णिला आहे.

२२८ □ अन्वयार्थ