पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील धार्मिक आणि


राजकीय चर्चा व चिंतन



वि. दा. वासमकर


 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही लक्ष्मीकांत देशमुख यांची महत्त्वाची कादंबरी आहे. सतत हिंसाचाराने त्रस्त असणाऱ्या अफगाणिस्तानच्या जनतेच्या हलाखीची नरकप्राय यातनांची कथा आहे. १९७० नंतरचा अफगाणिस्तानचा इतिहास कथन करणे आणि रशियाप्रणीत धोरणाला अनुसरून चालणाऱ्या राजवटी आणि इस्लामला महत्त्व देऊन वाटचाल करणाऱ्या मुजाहिदीन, तालीबान टोळ्यांचा सत्ता प्रस्थापित करण्यापर्यंतचा व्यापक पट लक्ष्मीकांत देशमुख यांनी कादंबरीत मांडला आहे. आकाराने प्रचंड असूनही या कादंबरीला सुसंगत आवाका लाभला आहे. राजकारण आणि धर्म यांचा वास्तव पातळीवर वेध घेताना देशमुख यांनी कल्पनेचाही कौशल्याने वापर करून ही कादंबरी सिद्ध केली आहे.
 प्रस्तुत निबंधात 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीतील धार्मिक आणि राजकीय पातळीवरील चर्चा आणि चिंतन यांचे स्वरूप काय आहे, याचा विचार करावयाचा आहे.

 प्रस्तुत कादंबरीतील केंद्रवर्ती असलेल्या दोन पक्षांचे वर्णन पुढीलप्रमाणे येते सहाव्या दशकाच्या उत्तरार्ध व सातव्या दशकाचा प्रारंभ हा अफगाणिस्तान - विशेषत: काबूल शहरासाठी धार्मिक - इस्लामिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीनं व्यापलेला आहे. वाढत्या कम्युनिझमला विरोध म्हणून तेवढ्याच तीव्रतेनं धार्मिक निदर्शनं, चळवळी चालू होत्या. त्याच्यामागे शोर बाजारचे हजरतसाहेब, नक्शबंदी संप्रदायाचे जनाब मीर अली व पीर सय्यद जिलानीसारखे परंपरेतून पुढे आलेले नेते आहेत. तसेच प्रोफेसर करीमुल्लांसारखे धार्मिक बुद्धिवादी नेतेही आहेत व संसद सदस्य लतीफसारखे लोकप्रतिनिधीही आहेत. सर्वात महत्त्वाचे योगदान आहे ते मात्र गुल, रब्बानी, शमसू या त्रयीचं. पुढील काळात ही त्रिमूर्ती आणि सोव्हिएन युनियनवादी तराकी, करमाल, अमीन ही त्रिमूर्ती यांचा दिलचस्प तीव्र संघर्ष

२२६ □ अन्वयार्थ