पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 'महान' विचारधारेची ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे. प्रत्येक 'महान' विचारधारा - मग ती साम्यवादाची असो की इस्लामाची, हिंदुत्ववादी असो की सेक्यलर. लिबरल डेमॉक्रॅटिक असो की कंझर्वेटिव्ह, अभिजन असो की बहुजन, प्रस्थापित असो की विस्थापित - सगळ्यांमध्ये विरोधाभास असतातच; पण त्यांच्याकडे कानाडोळा करत या विचारधारा स्वविरोधी, 'महान नसलेल्या' विचारांना संपवून टाकण्याचा विडा उचलतात. 'महान विचारांची' खासियत ही निरंकश सत्ता, तिचं समर्थन आणि तिच्याआड येणाऱ्या लहानमोठ्या विरोधांची मुस्कटदाबी हीच असते. यातूनच पुढे एकसंध समाज निर्माण करण्याची देदीप्यमान स्वप्नं बघितली जाऊन विचारवैविध्याचं निघृण निर्दालन होतं. जसा कालचा 'इन्किलाबी' विचार याला अपवाद नव्हता, तसाच आजचा 'जिहादी' विचारसुद्धा याला अपवाद नाही.
 कृतक् वैचारिकता ही स्वत:मध्ये रममाण होणाऱ्या, स्वत:च्या प्रेमात पडलेल्या रमणीसारखी असते, तिला स्वत:च्या आवाजाचे प्रतिध्वनीच तेवढे ऐकू येतात. ती सूक्ष्मरूप धारण करत असली तरी तिचे दमनयंत्र बटबटीत असतं. कुठल्याही विचारधारेची (ideology) शोकांतिका ही तिची सत्ताकांक्षाच असते. पण इतके स्वच्छपणे हे कुठल्याही सत्ताधीशाला कळलेलं नसतं. आपल्या सत्तेचं समर्थन देत तिचा परीघ वाढवणं हेच त्याचं आद्य कर्तव्य. मात्र जे राष्ट्राध्यक्षांना, पक्ष कार्यकर्त्यांना, श्रद्धाळू अनुयायांना किंवा बलिदानाच्या प्रेरणेने मुसंडी मारणाऱ्या “मानवी बाँब'ला दिसत नसतं ते लेखकाला दिसतं. कादंबरीकाराला उमगतं.
 समूहजीवनाच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कप्प्यांमधल्या घडामोडींना अतिरिक्त महत्त्व देत व्यक्तीच्या मानवी आकाराच्या व्यक्तिगत आशा-आकांक्षांना हीन लेखणाऱ्या, त्यांना तुच्छ लेखणाऱ्या राजकीय । धार्मिक / आदर्शवादी वगैरे वगैरे विचारांचं वैयर्थ्य फक्त कादंबरीकारालाच उमगतं. कारण त्याच्या निर्मितीची कच्ची सामग्री निसरडे विचार नसून धगधगीत भावना असतात.

 अर्थ हरवलेल्या शब्दांचा बेरका वापर करून सत्तापालक प्रजेला भूल देतो. तर शब्दांचा हरवलेला अर्थ लेखक वाचकाला शोधून देत त्याचे अर्थाचे भान तीव्र करतो. राजकीय विचारसरणी संपते कुठे आणि वैचारिक दडपशाही सुरू होते कुठे, हे फक्त अस्सल राजकीय कादंबरीकारच सांगू शकतो. तोच सामान्य वाचकाला वैचारिक शुद्धतेच्या आग्रहाकडे खेळकर नजरेनं बघणं शिकवतो. कादंबरी सत्यअसत्याचे पाठभेद शिकवते. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मधून हे काही अंशी साध्य होतं म्हणून ही कादंबरी सत्तेच्या निघृण वाटमारीच्या तुलनेत आगळीवेगळी मौलिक घटना ठरते. यासाठीच तिचं स्वागत!

अन्वयार्थ □ २२५