पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोंजारलं तर सत्ता हातून सटकते आणि सत्तेला गोंजारलं तर विवेकाला रामराम ठोकावा लागतो, हे वास्तव कादंबरीतले ऐतिहासिक नेते स्वीकारतात, हेच 'रिअलपॉलिटिक'. कादंबरीतले काल्पनिक पात्रं मात्र नेमकं यांच्याविरुद्ध वागताना दिसतात.

 कादंबरीच्या ऐतिहासिकतेला कधी समांतर जाणारे तर कधी छेद देणारे करिमुल्ला, इलियस किंवा अन्वरसारखे पुरुष मात्र स्वत:च्या मनाचा आवाज ऐकत, अंतर्मनाच्या प्रकाशाला अनुसरून प्रवास करतात. कादंबरीच्या शेवटी - म्हणजे जमीलाचे शोकात्म हौतात्म्य घडते तेव्हा कादंबरी संपते. पण त्यापूर्वी ऐतिहासिक अपरिहार्यतेला शरण जाणारी कादंबरी व्यक्तिनिष्ठ, भावुक वळण घेते. अप्रत्यक्षपणे का होईना, पण राजकीय सत्तेच्या शुष्क वास्तवावर आदर्शवादाचा उतारा सुचवला जातो. तो उपरतीच्या काल्पनिक अंगाने विकसित होतो. म्हणून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' हा प्रचंड मोठा पट असलेला एक रोमँटिक जाहीरनामा ठरतो. याच संवेदनशीलतेमुळे कादंबरीतल्या काही घटना नाटकी वाटतात.

सत्तेवर कादंबरीची अधिसत्ता


 सत्तेच्या प्रेरणेचं स्वत:चं तर्कशास्त्र असतं. या तर्कात शुद्धतेचा दुराग्रह जसा स्थायिभाव असतो, तसाच 'आम्ही आणि इतर' हे द्वंद्वसुद्धा या द्वंद्वातले 'आम्ही' शुद्ध तर 'इतर' अशुद्ध ठरतात. अफगाणिस्थानच्या या कादंबरीपुरतं बोलायचं झालं, तर सुरुवातीला सोव्हिएट रशिया प्रेरित कम्युनिस्ट राजवट अफगाणिस्थानच्या केंद्रस्थानी म्हणून 'आम्ही' या कल्पनेत गणली गेली होती. ही 'आम्ही' मंडळी

वैचारिक शुद्धतेची खेळी करतात आणि आपल्या विचारांशी समांतर न जाणाऱ्या 'इतर' विचारव्यूहांना अशुद्ध घोषित करतात. त्यांच्याविरुद्ध हिंसेचा वापर करून इतरांचा नि:पात घडवून आणतात. या नि:पाताचं एक तर्कशास्त्र निर्माण झालं की कम्युनिस्ट राजवटीमधलं विरोधकाचं 'पर्जीग' समजून घेता येतं.

 शुद्धतेची ही खेळी उलटते आणि अफगाणिस्थानमध्ये 'इस्लाम खतरे में हैं' ची हाळी सर्वत्र ऐकू येते. मग जिहादी शक्तिमान होतात. कालचे 'इतर' आज 'आम्ही' होतात आणि काफिर कम्युनिस्टांच्या नि:पाताच्या योजना राबवल्या जातात. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात. जन्नतचे दरवाजे उघडले जातात. जिहादींना आश्वस्त वाटू लागतं. इस्लामच्या शुद्धतेचा आग्रह सर्वव्यापी होत आंतरराष्ट्रीय स्तर गाठतो. कादंबरीत येणाऱ्या दोन्ही विचारधारा या अंतिमत: निरंकुश सत्तेच्या आकांक्षा व्यक्त करणाऱ्याच आहेत. अवघं जग पादाक्रांत करण्याचं संभावित स्वप्न बघणाऱ्या आहेत. म्हणूनच कम्युनिझम काय किंवा इस्लाम काय, दोन्हीही साम्राज्यवादी शक्तीच ठरतात.

२२४ □ अन्वयार्थ