पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंसक प्रेरणांची - विशाल मानवतावादाच्या अंगांनं केलेली कठोर समीक्षा म्हणता येईल. वा इतिहासात दोनच प्रमुख पात्रं. 'इन्किलाबी' म्हणजे कम्युनिस्ट्स आणि 'जिहादी' म्हणजे इस्लामिक अतिरेकी. दोघांच्या हातांवर निरपराध जनतेच्या रक्ताचे डाग आहेत. पैकी इन्किलाबीच्या हातावरचे डाग सुकले असले, तरी जिहादीच्या पंज्यांवरचं रक्त ओलंच आहे.
 आंतरराष्ट्रीय दहशतवादाची पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी इतिहासात रममाण होणाऱ्या मराठी वाचकांसाठी चांगला रुचिपालट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अवतीभवती घडून गेलेल्या ऐतिहासिक अफगाणिस्थानच्या पुरुषसत्ताक सांस्कृतिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी अफगाणी स्त्रीच्या मनाचं पर्यावरण, तिच्या मुक्तीच्या ऊर्मी, तिच्या समतेचा लढा स्त्रीवादी दृष्टिकोनातून चित्रित करते त्यामुळे या मोठ्या कादंबरीचा तोल केवळ पुरुषकेंद्री किंवा केवळ स्त्रीकेंद्री न होता तो उभयकेंद्री होतो. कादंबरीची ही जमेची बाजू. कादंबरीत भेटणाऱ्या सलमा, अनाहिता, तराना, झोरा, झैनाब, झरीना, मरुफ आणि जमिला या मनस्वी स्त्रिया या राजकीय कादंबरीला खऱ्या अर्थाने भावनांची समृद्धी देतात.
 घटनांमध्ये स्वत:चा वर्तमानकाळ बुडवून टाकणारा भावुक मराठी वाचक 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' वाचताना एकदम अटकेपार म्हणजे, टागोरांच्या काबुलीवाल्याच्या देशात, अफगाणिस्थानातच जाऊन पोहोचतो. वाचता वाचता तो या देशाच्या इतिहासाशीच नव्हे, तर भूगोलाशीसुद्धा एकरूप होतो.
 रम्य आणि तपशीलवार भौगोलिक वर्णनं ही कादंबरीची वैशिष्ट्यं 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये ठासून भरलेली आहेत. ती वर्णनं वाचून लेखक अफगाणिस्थानमध्ये राहून आल्याचा वाचकाला प्रत्यय येतो. परंतु ती वस्तुस्थिती नाही. देशमुखांनी कल्पनेच्या भरारीवर अवघा अफगाणिस्थान उभा केला आहे. अफगाणिस्थानची गेल्या अर्ध्या शतकातली गोष्ट सांगता सांगता लेखकाची स्कॉलरशिप संपते कुठे आणि त्याचा प्रतिभाविलास सुरू होतो कुठे, याचा वाचकाला थांग लागत नाही.

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी नेमकी कशी समजून घ्यायची? त्यातले राजकीय तपशील आणि विश्लेषण तथ्यावर आधारित असले, तरी काही प्रमुख पात्रांचे भावजीवन, प्रतिभेची निर्मिती आहे. ही सरमिसळ जशी कादंबरीची शक्ती ठरते, तशीच ती आस्वादाच्या अंगाने कूटप्रश्न निर्माण करते. सत्तेची अपरिहार्यता एकीकडे, तर तिच्याशी झुंजणाऱ्या व्यक्तींच्या अंतर्मनाचा कौल दुसरीकडे, असं काहीतरी कादंबरीभर घडतं. हा ताण वस्तुनिष्ठ विरुद्ध व्यक्तिनिष्ठ शक्तींचा आहे. लोकप्रिय, वाचकसापेक्ष ऐतिहासिक कथनाचं, हे वैशिष्ट्यच मानलं पाहिजे.

अन्वयार्थ □ २१९