पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इन्किलाब विरुद्ध जिहाद

विश्राम गुप्ते
राजकीय सत्तेची समीक्षा


 "आपण बंदिस्त व जगाच्या अंतापर्यंत न बदलणाऱ्या धर्माच्या आधारे जगण्याचा व पुढे जाण्याचा प्रयत्न करू, तर आपली गती एवढी मंद राहील, की सारं जग कुठच्या कुठे निघून जाईल. आपण इररेलेव्हंट - निरर्थक ठरू."
 पुढे अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या नूरमहंमद तराकीच्या तोंडचे हे शब्द 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या लक्ष्मीकांत देशमुखांच्या ९३४ पानांच्या कादंबरीत सुरुवातीसच भेटतात. इस्लामची तरफदारी करणाऱ्या इलियसला पटवून देताना नूरमहंमद तराकी हे बोलून जातो. त्यातून अफगाणिस्थानच्या भविष्याचे भीषण संकेत मिळतात. कादंबरीतला इलियस काल्पनिक आहे. तराकी मात्र ऐतिहासिक आहे.
 कल्पना आणि इतिहासाची सरमिसळ असलेली ही कादंबरी म्हणजे, अफगाणिस्थानमधला अपरिवर्तनीय कडवा इस्लाम विरुद्ध पोथीनिष्ठ; साम्राज्यवादी कम्युनिझमची अतिशय अभ्यासपूर्ण, रोचक, डॉक्युमेंटरीच्या अंगानं विकसित होणारी अर्ध्या शतकाची कर्मकहाणी आहे. आकारानं भव्य असलेली, ही कादंबरी अफगाणिस्थानचा गेल्या चाळीस-पन्नास वर्षाचा रक्तरंजित पण लालित्यपूर्ण इतिहास आहे.
 अफगाणिस्थानची सर्वंकष सत्ता आपल्या हाती यावी म्हणून सोव्हिएट रशियाप्रायोजित कम्युनिस्ट विचारधारेविरुद्ध स्थानिक इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी दिलेल्या प्रदीर्घ टकरावाची ही कथा आहे. साम्यवाद आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून, अफगाणिस्थानमध्ये बुलंद झालेल्या इस्लामिक चळवळीचं ध्येय हे अनिबंध राजकीय सत्ताच. एकदा सत्तेची अपरिहार्यता मानली, की हिंसा तर्काधिष्ठित ठरून सर्वसामान्य जनतेचं कर दमन ओघानं आलंच. हेच कादंबरीचं प्रमुख विधान.

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही एकूणच राजकीय सत्तेची, तिच्यातल्या अंगभूत

२१८ □ अन्वयार्थ