पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचं देशमुखांना भान आहे. ते या दोन घटकांचा उपयोग वास्तव सत्य म्हणून करतात आणि सामाजिक व सांस्कृतिक या घटकांच्या मदतीने 'Fiction' उभी करतात.
 आंतरराष्ट्रीय शीत युद्धातील शह-काटशह, आजचा तिथला जहाल इस्लामी आंतरराष्ट्रीय दहशतवाद, बामियानमधील महाकाय बुद्धमूर्तीचे विध्वंसन करण्यामागील मानसिकता, आत्यंतिक धर्मांधता, मुजाहिद व तालिबान यांच्या हातात आलेली सत्ता आणि सत्तेचा मद, श्रद्धाळू अफगाणांची त्यांच्याच नेत्यांनी केलेली दिशाभूल, साम्यवादी सोव्हिएत युनियन आणि पाकिस्तनच्या मागे उभी असलली अमेरिकन भांडवलशाही विचारधारा यांतील संघर्षामध्ये भूमी म्हणून वापरले जाण्याचे परिणाम..... यांच्या जोडीला जहाल इस्लाम पुनरुज्जीवनवाद्यांनी सुधारणा व आधुनिकता आणि ज्ञान व स्वातंत्र्य यांना शत्रू मानून समाजाला धर्माच्या नावाखाली चौदा-पंधराव्या शतकात ढकलण्याचा केलेला प्रयत्न, तालिबानी फतव्यामुळे अफगाण स्त्रीचे उद्ध्वस्त झालेले जीवन.... या वास्तवाला लक्ष्मीकांत देशमुखांनी सर्वसामान्य अफगाणी माणसाच्या वाट्याला आलेले भोग, दुःख, हाल, अपेष्टा, अनिश्चितता याचा नवा आयाम जोडला व त्यातून कादंबरी बनत गेली.
 अन्वर, करीमुल्ला, इलियास व त्यांचे कुटुंबीय; सलमा, बेनझीर, जमीलाच्या माध्यमातून अफगाणी स्त्रीची प्रखरता; देशाच्या व औरत जातीच्या सन्मानासाठी शहीद झालेली जमीला आणि तिच्या मृतदेहाभोवती उभी असलेली बेनझीर.... हा अत्युच्च बिंदूकडे कांदबरीचा झालेला प्रवास हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.
 एखाद्या दीर्घ कालातील ऐतिहासिक धागे राजकीय घटनांच्या अन्वयार्थाला जोडून त्यात कल्पित पात्रांचे उपयोजन करीत त्यांना उभं करणं, हे आव्हान देशमुखांनी पेललं आहे.
 भाषेचा बाज, आवश्यक तेथे केलेल्या भाष्यातील नेमकेपणा, संवादलेखन चातुर्य, आशयसूत्राचे कथानकात केलेले सुरेख रूपांतर, कन्सिव्ह केलेले रसपूर्ण प्रसंग ही अंगेही उत्तम आहेत.
 पण यापेक्षा महत्त्वाच्या इतर काही बाबी आहेत आणि त्यामुळे ही कादंबरी मोठीच नव्हे, तर महत्त्वाची ठरते.

 मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, ९ / ११ ची घटना, अल् कायदाचे दूरवर पोहोचणारे हात, जळणारा काश्मीर या स्टिम्युली देशमुखांना आवाहन करीत असतील; परंतु Artist has an ability not to react to immediate stimuli हे तत्त्व देशमुख मानत असावेत. त्यांच्या अंतर्मनात हा विषय मुरत गेला, वाढत राहिला, त्याला निरनिराळ्या मिती मिळत गेल्या आणि जेव्हा या सर्वांचे वजन देशमुखांना असह्य झाले - या ताणातून मुक्त होण्याची निकड त्यांच्या मनाला भासू लागली व

२१६ □ अन्वयार्थ