पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मोठा अवकाश पेलणारी महाकादंबरी :

अनंत मनोहर

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही महाकादंबरी आहे.
 महाकादंबरी म्हणजे (पृष्ठसंख्येने) मोठी नव्हे; तिने व्यापलेला अवकाश मोठा आहे. तिने फार मोठ स्पॅन व्यापला आहे, म्हणून ती महा; तिच्यात वाङ्मयीन महात्मतेचा प्रत्येय येतो.
 ज्याला अनेक पदर आहेत, पैलू आहेत, अंग - उपांगे आहेत, अनेक स्तर आहेत - अशी ही महाकादंबरी आहे. ती अनेक ठिकाणी वास्तवाला भिडते, परंतु त्यात अडकत नाही. या वास्तवातील रस, कस शोषून ती अधिक पुष्ट व संपन्न बनते.
 वैयक्तिक आशयसूत्रात बांधली गेलेली कादंबरी एकारते. तिची वाढ उंचीच्या एकच एक परिमाणात होते. तिला एकच मिती असते. तसे या कादंबरीचे होत नाही, कारण तिचे आशयसूत्र बहुमितींचे व प्रसरणशील आहे.
 ज्या देशात निर्नायकी गेली कित्येक दशके चालू आहे, अत्याचार आणि विध्वंस हा जिथे परवलीचा शब्द बनला आहे... एकाधिकारशाही, जुलमी राजसत्ता, लष्करशाही अशा राजवटीत माणसांची जीवने कुस्करली जात आहेत; अशा एखाद्या देशाचं, समाजाचं चित्रण करणं हा एक महकादंबरीचा विषय आहे, हे देशमुखांनी बरोबर हेरलं. अफगाणिस्तानात तर टोळीवाल्यांचे राज्य गेली अनेक शतकं चालू आहे. अजूनही तिथे काबूलच्या मध्यवर्ती शासनाच्या शब्दापेक्षा टोळीप्रमुखांचा आदेश जास्त मानला जातो.
 अफगाणिस्तानची लोकसंख्या दीडएक कोटी.

 देशमुखांनी कादंबरीच्या पटावर हा देश घेतला. त्याची शेजारी राष्ट्रे भोवती मांडली. राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक हे त्याचे स्तर तपासले. ऐतिहासिक व राजकीय घटनाचित्रणात आपल्याला फारसे स्वातंत्र्य मिळत नसतं.

अन्वयार्थ □ २१५