पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोटीतील आहे आणि काहीही झाले तरी करझाईची, म्हणजेच अमेरिकेची, सत्ता काबूलपुरतीच मर्यादित आहे. अशा प्रवाही परिस्थितीत देशमुखांची ही महाकादंबरी मराठीत अवतरते आहे.
 'राजहंस प्रकाशन' चे दिलीप माजगावकर यांनी ती आपल्या चोखंदळ शिस्तीने प्रकाशित केली आहे. कादंबरीचे मूळ हस्तलिखित उचलले तेव्हा त्यांचा नाजूक खांदाच निखळला होता. असे सांगतात, पण तेवढ्याने हार न मानता कादंबरीतील शब्द शब्द तपासून, तीमधील जादा मेद काढून ती सर्वसामन्य वाचकांनाही फारशी दमछाक न होता पेलता येईल अशी सुटसुटीत करवून घेतली. विशेष श्रम घेऊन करवून घेतलेले मुखपृष्ठ, आतील छायाचित्रांची रेलचेल, नकाशे वगैरे गोष्टी पाहता, माजगावकरांनी देशमुखांच्या या महाकादंबरीवर जीव लावलेला दिसतो. 'राजहंस' च्या सगळ्याच कादंबऱ्यांना हे भाग्य लाभते, असे नव्हे. त्यांचे अंदाज सहसा चुकत नाहीत, यावरूनही चाणाक्ष वाचक आणि अर्थातच हिशेबी ग्रंथविक्रेते कादंबरीचे आपापल्या परीने मूल्यमापन करतील, यात शंका नाही.
 कादंबरीकाराने आपल्याच भाषेतील दुसऱ्याच्या कादंबरीचे मन:पूर्वक कौतुक . करणे किती अवघड असते, हे मराठी भाषकांना, किमान साहित्य वर्तुळांना चांगलेच ठाऊक असावे. पण ते तेवढेच आनंदाचे व समाधानाचे असते, हे कित्येकांना माहीत नसेल; तशी ही देशमुखांची कादंबरी आहे. मराठी साहित्यविश्वात नवी गुणात्मक भर घालणारी आणि कदाचित नवा पायंडा पाडणारीही.

२१४ □ अन्वयार्थ