पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खोदून तिचे दफन करणारा राष्ट्रप्रमुख अमीन, करमालचे पुनरागमन, नजीबची भयंकर अखेर आणि पळून जाण्याची संधी असूनही तालिबानच्या राजवटीत दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पत्करणारी जमीला..... अशा किती तरी घटना वाचकाला अंतर्बाह्य हादरून सोडतात. ही किमया लेखणीची नसून देशमुखांनी निर्माण केलेल्या माहोलची आणि वास्तवतेशी राखलेल्या इमानदारीची; त्यामुळेच त्यांच्या पात्रांचा रोमान्स कधी अतिरेकी किंवा बाळबोध वाटला तरी खटकत नाही, कारण अफगाणिस्तानचे पाणीच तसे असावे.
 देशमुख गेली सात - आठ वर्षेतरी या कादंबरीची तयारी करीत असावेत. अफगाणिस्तानचा भूगोल आणि इतिहास त्यांनी आत्मसात केला आहे, याचा प्रत्यय येतो. काबूल, कंदाहार, पगमान इत्यादी ठिकाणांचे अफगाणी निसर्गाचे खास सौंदर्य तर ते नेटके उभे करतातच; पण शहरांचे, रस्त्यांचे, पुलांचे तपशीलही सराईतपणे उभे करतात. काबूल विद्यापीठाचे बुद्धिवादी वातावरण, अफगाणी रईस, उच्चबूंच्या सुसंस्कृत राहणीची नजाकत, त्यांच्या कविता, त्यांचा इतिहास, त्यांच्या बागा आणि रसिक कलाकारी, भूमिहीनांचे शोषण त्यांचे दारिद्र्य, पिचलेपण, देशातील विविध टोळ्यांमधील सत्तास्पर्धा आणि त्याचे राजकारण, धर्माचे अफगाणी जीवनातील स्थान आणि स्त्रियांची हतबलता.... अनाहिता, सलमा, जमीला आदी बंडखोर स्त्रियांना सोसावा लागणारा सामाजिक छळ...... इत्यादी गोष्टींचे प्रत्ययकारी चित्रण कथानकाच्या सहज ओघात येते.

 धर्मचिकित्सेची चिकित्सा, कर्मठ मूलतत्त्ववाद्यांची चिकित्सा, उदारमतवाद की साम्यवाद असा अफगाणी परिस्थितीत उपलब्ध नसलेला विकल्प; किंबहुना या दोहोंची (उदारमतवाद व साम्यवाद) अफगाणी भूमीत पेरणी व रुजवणूक होण्याची असंभाव्यता आणि या विचित्र विरोधाभासाने निर्माण केलेले राक्षसी संघर्ष असेही सर्व या कादंबरीत येते. त्याचबरोबर स्त्रियांचे इस्लाममधील स्थान, उदारमतवादी मुस्लिमांची मूलतत्त्ववाद्यांकडून होणारी कोंडी, साम्यवादी विचारांच्या राजवटीने हाती घेतलेल्या प्रागतिक जमीन सुधारणांना होणारा कडवा विरोध..... पाकिस्तानी, रशियन आणि अमेरिकन गुप्तहेरांच्या कारवाया...... कम्युनिस्टांचा पाडाव करण्यासाठी कडव्या मूलतत्त्ववाद्यांना पोसण्याचे अमेरिकेचे बेगुमान धोरण..... या सर्व गोष्टीचे चर्वितचर्वण कथानकांच्या, संभाषणाच्या आणि घटनांच्या ओघात एवढे सहजपणे येते की, आपण वैचारिक चर्चेमध्ये गुंतून जातो आहोत, हेही वाचकांच्या ध्यानात न यावे. देशमुखांची कादंबरी लिहून झाल्यावरही अफगाणी काबूल नदीमधून पुष्कळ पाणी वाहून गेले आहे. मुल्ला ओमरचा प्रभाव अजूनही पुष्कळ भागांवर आहे. अमेरिकेने एवढा धुमाकूळ घालूनही तालिबानचे सत्तेवरील पुनरागमन शक्यतेच्या

अन्वयार्थ □ २१३