पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इन्किलाब विरुद्ध जिहाद

अरुण साधू

 आकाराने प्रचंड असूनही तिला सुसंगत असा आवाका, आशयगर्भता व भव्यता, मानवी व्यवहाराची व सृष्टीच्या गुंतागुंतीची बऱ्यापैकी समज, विस्तृत पटावर सोंगट्याप्रमाणे विखुरलेल्या पात्रांवर घट्ट पकड, वास्तवता पोटात घेणारी कल्पनारम्यता, राजकारण, तत्त्वविचार आणि कथात्मक गुंतवणूक यांची बेमालूम पेड विणण्याचे कौशल्य - अशी गुणसंपन्न व महत्त्वाकांक्षा कांदबरी मराठीत गवसणे हा दुर्मीळ योग आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांची 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही ९०० पानांची घसघशीत कादंबरी त्या दृष्टीने मराठी साहित्यप्रेमिकांना आशेचे किरण दाखविणारी आहे. विषय, आशय, विस्तार आणि खोली या सर्व गुणविशेषांमध्ये ही कादंबरी मराठीतील पहिल्या रांगेतील कादंबऱ्यांत बसू शकेल, असे म्हणणे पुरेसे नाही; विषय आणि आशय या बाबींमध्ये ती नवी वाट चोखाळणारी कादंबरी आहे. विषय आहे अफगाणिस्तान. तेथील कोणी बादशाह, नेता, व्यक्ती वा प्रेमीयुगल नव्हे. दुर्दैवाच्या, हिंसेच्या व रक्तपाताच्या फेऱ्यात सापडलेल्या अभागी देशाची ही कहाणी. खरे म्हणजे, सामान्य वाचकांना बिचकवून टाकणारा हा विषय, पण देशमुखांनी मानवी कथेचा, त्या देशाचा दुर्दैवाचा, वैचारिक, राजकीय आणि हिंस्र संघर्षाचा असा काही नजारा खुलविला आहे की, जाणकारांनी स्तिमित व्हावे आणि सामान्य वाचकांनीही खिळून जावे.

 अफगाणिस्तान हा स्वातंत्र्यपूर्व काळातील आपला शेजारी, अफगाणी पठाणांना भारताविषयी आपुलकी आहे तो तेव्हापासून. कित्येक अफगाणी नेते, बुद्धिमंत त्या काळातील हिंदुस्तानी विद्यापीठांमधून शिकून जात. गिरण्यांच्या फाटकांसमोर उभे राहून सोटे दाखवीत कर्ज आणि व्याज वसूल करणारे मस्तवाल पठाण, एवढीच आपल्यासामोरची अफगाणी लोकांची प्रतिमा. फार झाले तर 'दीवार' मध्ये अभिताभ बच्चनला मदत कणारा, सच्च्या दिलाचा, शब्दाला प्राणापलीकडे जपणारा, बिनधास्त पण प्रेमळ असा अभिनेता प्राणने साकार केलेला पठाण. अफगाणातही सुशिक्षित,

२१० □ अन्वयार्थ